त्यांनी नगरसेवकांची ‘लायकी’ काढली अन् कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्याला ‘कानफाडले’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – अधिकारी चोऱ्या करतात असे नगरसेवक म्हणताच तुमची लायकी काय असे म्हणणारे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना कार्यकर्त्यांनी कानफडले. महापौर कार्यालयात महापौरांदेखत हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे.

जलपर्णीची निविदा आठपट दराने काढल्याने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नगरसेवकांनी महापौर मुक्ता टिळक यांच्या दालनात बैठे आंदोलन केले. यावेळी दोषी अधिकाऱ्यांची चौकशी करा अशी मागणी विरोधीपक्षाच्या नगरसेवकांनी केली. यावेळी तेथे उपस्थित असलेले अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर हे महापौरांना माहिती देत होते. त्याचवेळी नगरसेवकांनी ज्यांच्या अधिकाराखाली निविदा प्रक्रिया राबवली त्यांच्याकडून खुलासा नको. अधिकारी चोर आहेत, असा आरोप काँग्रेस चे नगरसेवक रविंद्र धंगेकर यांनी केला. त्याला प्रत्युत्तर देताना निंबाळकर यांनी असे ऐकून घ्यायला आम्ही आलेलो नाही, तुमची काय लायकी आहे, असे सुनावले. यामुळे नगरसेवक संतप्त झाले. तुम्ही आमची लायकी काढणारे कोण, असे म्हणत निंबाळकर यांना जाब विचारू लागले. त्यावेळी येथे उपस्थित असलेल्या कार्यकर्त्याने निंबाळकर यांच्या श्रीमुखात भडकवली.

यामुळे वातावरण अधिकच चिघळले. सुरक्षा रक्षकांनी निंबाळकर यांना तेथून बाहेर नेले. अतिरिक्त आयुक्तांच्या उत्तरावर महापौरांनीही नाराजी व्यक्त केली. तत्पूर्वी आयुक्तांशी संवाद साधून जलपर्णी काढण्याची निविदा रद्द करण्याचे आदेश दिले. तसेच या निविदेची चौकशी चोवीस तासात करून त्यामध्ये दोषी आढळणाऱ्यावर कारवाई करावी, असे आश्वासन विरोधकांना दिले. विरोधी पक्षनेते दिलीप बराटे, राष्ट्रवादी चे शहराध्यक्ष चेतन तुपे, काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांच्यासह दोन्ही पक्षाचे नगरसेवक आणि कार्यकर्ते उपस्थित होते.