पुणे जिल्ह्यातील घटना ! घराच्या वादातून धाकट्याने थोरल्या भावाला पेट्रोल टाकून पेटविलं, उपचारादरम्यान थोरल्याचा मृत्यू

पोलिसनामा ऑनलाईन  : बारामती तालुक्यामधील सुपे येथील काळखैरेवाडी येथे घराच्या वादातून धाकट्या भावाने थोरल्या भावाला पेट्रोल ओतून पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला. यात थोरल्या भावाचा शुक्रवारी (ता. 14) दुपारी बाराच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याप्रकरणी धाकट्या भावावर गुन्हा दाखल झाला आहे.

मारुती वसंत भोंडवे (वय 48) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. तर, अनिल वसंत भोंडवे (वय 32) असे गुन्हा दाखल झालेल्या धाकटा भावाचे नाव आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी, बारामती तालुक्यामधील सुपे येथील काळखैरेवाडी येथे बुधवारी (दि.12) रात्री साडेअकराच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला. धाकटा भाऊ अनिल वसंत भोंडवे याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल झालाय.

राजबाग परिसरात दोघे राहतात. मारूती भोंडवे हे पत्नी सविता, मुलगा महेश आणि हर्षद यांच्यासोबत पत्र्याच्या घरात असताना आरोपी अनिल हा रात्री घरानजीक आला. त्याने मारुती यांना, तू वेगळे राहा, आमच्यात राहू नकोस, असे म्हणत घराच्या खिडकीच्या काचा फोडू लागला. तसेच त्याने घराच्या दरवाजाची बाहेरून कडी लावली. त्यानंतर खिडकीतून मारूती यांच्या अंगावर पेट्रोल टाकून काडीने पेटविले. यावेळी पतीला (मारुती) वाचविण्यासाठी पत्नी सविता गेल्या असता त्या देखील भाजून जखमी झाल्या आहेत.

दरम्यान, यामुळे आरडाओरडा झाल्यानंतर परिसरातील लोक जमा झाले. त्यांच्या मदतीने मारुती आणि सविता यांना दवाखान्यात दाखल केले.

पुणे इथल्या ससून रूग्णालयात गुरूवारी (दि.13) पोलिसांनी जबाब नोंदवला. मात्र, शुक्रवारी मारुती यांचा मृत्यू झाला. याबाबतचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे हे करीत आहेत.