Pune : कामगार महिलेच्या अपघाती मृत्यूप्रकरणी बिल्डरवर गुन्हा दाखल; वाघोलीतील डिफेन्स कॉलनी फेज 4 येथील घटना

शिक्रापुर : प्रतिनिधी –   वाघोली-भावडी रोडलगत असणाऱ्या डिफेन्स कॉलनी फेज ४ येथील बांधकाम साइटवर काम करत असताना लक्ष्मी नारायण माहुरे (वय, ३०, रा. वाघोली) या कामगार महिलेच्या झालेल्या अपघाती मृत्यू प्रकरणी बिल्डरवर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघोली येथील डिफेन्स कॉलनी फेज ४ येथे सोमवारी (दि.२६) सकाळी साडे दहाच्या सुमारास बिल्डींगचे टेरेसवर बांधकाम चालू असलेल्या साईटवरील मजूर कामगारांकडून काम करवून घेत असताना कामगारांचे जीविताचे व सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून त्यांना हेल्मेट, सुरक्षित जाळी, सेफ्टी बेल्ट आदी साधनसामुग्री पुरविणे आवश्यक असताना त्यांना तशी कोणतीही सुरक्षित साधने न पुरविता तसेच उघड्या डकटवर योग्य ती साधन ठेवण्याची सोय न करता हलगर्जीपणा व निष्काळजीपणा केल्यामुळे बिगारी महिला कामगार लक्ष्मी माहुरे या बिल्डींगचे फायर डकटच्या मोकळ्या जागेतून टेरेसवर काम करीत असताना खाली पडून मयत झाल्या होत्या. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास परमेश्वर पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार लोणीकंद पोलीस ठाण्यात प्रमोटर बिल्डरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बांधकाम करण्याचे मनाई आदेश असतानाही याठिकाणी सुरु असलेल्या बांधकामामध्ये कामगार महिलेचा मृत्यू झाल्याने गौरव सातव यांनी गुन्हा दाखल करण्याकडे पोलिसांकडे तक्रारी अर्ज केला होता.

संबंधित बांधकाम व्यवसायिक डिफेन्सच्या नावाने लोकांची दिशाभूल करत आहे तर अशा या दिशाभूल करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांवर पीएमआरडीए ने तात्काळ फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा .तसेच या महिलेचा अपघाती मृत्यू नसून घातपात असल्याची शक्यता असल्याने या प्रकरणाची पोलिसांनी सखोल अशी चौकशी करावी अशी मागणी वाघोलीतील सुज्ञ नागरिक करत आहेत…