Pune : प्लँटची बुकिंग रक्कम परत न करणार्‍या बिल्डरला ‘दणका’; एक लाख रुपये व्याजासह ग्राहकाला परत करावे लागणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सदनिकेचे बुकिंग रद्द केल्यानंतरही टोकन रक्कम परत न करणा-या एका बांधकाम व्यावसायिक कंपनीला अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दणका दिला आहे. बुकिंगपोटी स्वीकारलेले एक लाख रुपये १० टक्के व्याजाने परत करावे. तसेच नुकसान भरपाई पोटी २५ हजार, तर तक्रारीच्या खर्चापोटी ३ हजार रुपये देण्यात यावे, असा आदेश आयोगाने दिला आहे.

आयोगाचे अध्यक्ष जे. व्ही. देशमुख, सदस्य अनिल जवळेकर, शुभांगी दुनाखे यांनी हा निकाल दिला. याबाबत अभिजित बोराटे आणि भाग्यश्री बोराटे यांनी साहिल प्रॉपर्टीजचे प्रोप्रारायटर रणजितसिंग रजपूत आणि ट्रेन्ड होम्स यांच्याविरुद्ध आयोगात तक्रार दाखल केली होती. तक्रारदारांना सदनिका खरेदी करण्याची असल्याने त्यांनी जाबदेणार यांची भेट घेतली. ते विकसित करत असलेल्या प्रकल्पा विषयी माहिती घेतल्यानंतर तक्रारदारांनी त्यात एक सदनिका बुक केली.

सदनिकेच्या बुकिंगवेळी तक्रारदारांनी एक लाख रुपये भरले. त्यानंतर विरुद्धपक्षाने तक्रारदारांना वेलकम लेटर दिले. बुकिंग केलेल्या दिनांकापासून अ‍ॅग्रीमेंट फॉर सेल करणे गरजेचे होते. मात्र, बराच कालावधी गेल्यावर देखील विरुद्धपक्षाने अ‍ॅग्रीमेंट फॉर सेल केले नाही. वारंवार विनंती करून देखील तक्रारदारांना योग्य माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे तक्रारदारांनी २६ मार्च २०१९ रोजी बुकिंग रद्द करून भरलेली रक्कम परत करण्याची विनंती केली. त्याबाबतचा ई-मेल देखील त्यांनी बिल्डरला पाठवला.

बुकिंग केल्यावर १५ दिवसांच्या आत रद्द केल्यास कॅन्सलेशन पोटी ५१ हजार रुपयाची कपात करण्यात येईल असे, २९ मार्च २०१९ रोजी बिल्डरने सांगितले. त्यावर तक्रारदार यांनी कोणताही करार झालेला नसताना कपात करण्याचा प्रश्न येत नसल्याचे विरुद्धपक्षाला कळवले. दरम्यान वारंवार विनंती करून देखील रक्कम परत मिळत नसल्याने तक्रारदारांनी ग्राहक आयोगात धाव घेत तक्रार दाखल केली. बुकिंगसाठी भरलेले एक लाख रुपये १८ टक्के व्याजाने मिळावेत. तसेच मानसिक त्रासापोटी, तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम देण्यात यावी, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली. आयोगाने दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेत बुकींगपोटी भरलेले एक लाख रुपये व्याजासह परत करण्याचा आदेश बिल्डरला दिला.