Pune : बंडगार्डन पोलिस ठाण्यातील सहाय्यक निरीक्षकासह एक कर्मचारी तडकाफडकी निलंबीत

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – अटकेत असणारा बडतर्फ पोलीस शिपाई शैलेश जगताप याने ससून रुग्णालयात केलेल्या उपोषणादरम्यान त्याला मदत केल्याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षकास आणि एका कर्मचार्‍यास निलंबित करण्यात आले आहे. बंडगार्डन पोलीस ठाण्यात कार्यरत सहाय्यक निरीक्षक कार्यरत होते. अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांनी निलंबनाचे आदेश दिले आहेत.

सहायक पोलीस निरीक्षक (API) नीलेश सुरेश घोरपडे आणि सहाय्यक पोलिस फौजदार (ASI) राजेश ईश्वर कांबळे (बंडगार्डन पोलिस स्टेशन)असे निलंबित करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे.

गंभीर गुन्ह्यात शैलेश जगताप अटकेत आहे. या कालावधीत त्याने ११ ऑक्टोबरला ससून रुग्णालयात उपोषण करीत होता. त्यावेळी बंडगार्डन पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या पुणे स्टेशन पोलीस चौकीचे सहायक निरीक्षक नीलेश घोरपडे व त्यांच्या टीमला ससून रुग्णालयात जाउन जगतापचे समुपदेशन करण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार घोरपडे ससून रुग्णालयात गेले. शैलेश जगताप याला उपोषणाबाबत विचारपूस केली. त्यावेळी त्यांना रास्ता पेठेतील जागेचा ताबा घेण्यासाठी मोक्काचा गुन्हा दाखल करुन दबाव आणला जात असून, त्यामुळे आपण उपोषण करीत असल्याचे घोरपडे यांना सांगितले. मात्र, कर्तव्यावर असतानाही घोरपडे यांनी ही बाब वरिष्ठांच्या निदर्शनास आणली नाही. त्याची अनावश्यकरित्या स्टेशन डायरीमध्ये नोंद करण्याचा रिपोर्ट दिला. त्याशिवाय संबंधित रिपोर्ट हा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर व्हायरल झाला. त्यामुळे शासकीय गोपनियेता भंग झाल्याचा व पोलिस दलाची प्रतिमा मलीन झाल्याचा ठपका घोरपडे यांच्यावर ठेवण्यात आला. त्याशिवाय आरोपीला मदत केल्याचा ठपका ठेऊन त्यांना निलंबित करण्यात आले आहे.