Pune : सिंहगड रोड, वारजे, उत्तमनगरमध्ये घरफोडया, बंद फ्लॅट फोडून 14 लाखांचा ऐवज लंपास

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   शहरात घरफोड्यांचा धडाका कायम असून, सिंहगड रोडवर बंद फ्लॅट फोडून तबल 14 लाख 46 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे, तर वारजे आणि उत्तमनगर येथेही दोन फ्लॅट फोडण्यात आले आहेत. त्यामुळे पुणेकरांची चिंता आणखीनच वाढली आहे.

प्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात विजय गोखले (वय 60) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विजय गोखले यांचा धायरीत बंगला आहे. दरम्यान 17 नोव्हेंबरला सकाळी ते घराला कुलूप लावून कुटुंबासह बाहेर गावी गेले होते. यादरम्यान चोरट्यांनी त्यांच्या घराचा कडी-कोयडा तोडून आत प्रवेश केला. तसेच त्यानंतर घरातील सोन्याचे दागिने असा एकूण 14 लाख 46 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. गोखले काल बुधवारी सायंकाळी घरी परत आले असता, त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. यावेळी त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर सिंहगड रोड विभागाचे सहायक आयुक्त, वरिष्ठ निरीक्षक आणि इतरांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.

यासोबतच शिवणे येथे बंद फ्लॅट फोडून चोरट्यांनी सव्वा लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. याबाबत प्रवीण मोरे (वय 33) यांनी फिर्यादी दिली आहे. त्यानुसार उत्तमनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर वारजे माळवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गणेश निर्मळ (वय 27) यांचा फ्लॅट फोडला आहे. घराला कुलूप लावून गेले असता, चोरट्यांनी कुलूप उचकटून आत प्रवेश केला. तसेच 13 हजार रुपयांचा ऐवज चोरला आहे. अधिक तपास वारजे माळवाडी पोलीस करत आहेत.