Pune : शहरात घरफाेडीचे सत्र सुरूच, वारजे व लाेहगाव येथे घरफाेड्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात सुरू असलेल्या घरफोड्या काही केल्या थांबत नसून, पुन्हा चोरट्यांनी वारजे व लोहगाव येथे बंद फ्लॅट फोडले आहेत. यात पावणेतीन लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.

वारजेतील अभिषेक शहाणे (वय ३१) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे उरीटनगरच्या स्वर्णतीर्थ निवास येथे राहतात. शनिवारी दुपारी कामानिमित्ताने ते बाहेर गेले होते. त्यानंतर चोरट्यांनी फ्लॅटच्या खिडकीचे गज कापून आत प्रवेश केला. त्यांच्या बेडरूममध्ये असलेल्या कपाटातून 1 लाख ८२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. फिर्यादी परत आल्यानंतर त्यांना घरफोडी झाल्याचे दिसून आले. त्यांनी वारजे पोलिसांना घटनेची माहिती दिली. सीसीटीव्हीच्या मदतीने तपास सुरू आहे, तर दुसरी घटना विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. लोहगाव येथे राहणाऱ्या एका ३४ वर्षीय महिलेचा बंद फ्लॅट फोडून चोरट्यांनी रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा ९१ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचा प्रकार घडला आहे. फिर्यादी या २७ नोव्हेंबर रोजी कामाच्या निमित्ताने बाहेर गेल्या होत्या. त्यानंतर अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचा मुख्य दरवाजा कुलूप तोडून आत प्रवेश केला. बेडरूमच्या कपाटात असलेली रोकड व सोन्याचे दागिने असा ९१ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. अधिक तपास विमानतळ पोलीस करत आहेत.