Pune : 25 कोटींचे कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने व्यवसायिकाची दीड कोटींची फसवणूक

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – २५ कोटी रूपयांचे कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने व्यवसायिकाची दीड कोटी रूपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. दोघांना अटक केली असून, तिघांचा शोध घेतला जात आहे.

याप्रकरणी सोमनाथ ज्ञानदेव माने (वय ३३, रा. घोरपडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पंकज पांडे, जयंत गायकवाड, सात्विक चंद्रशेखर, अविनाश गुराप्पा व समीर मोहम्मद यांच्यावर खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पांडे व गायकवाड यांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी हे घोरपडी परिसरात राहण्यास आहेत. त्यांच्या टॅक्स अँड बिझनेस कन्सल्टन्सीचा व्यवसाय आहे. माने व पांडे हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. फिर्यादी यांना २५ कोटी रूपयांची आवश्यकता होती. त्याची माहिती पांडे याला समजल्यानंतर त्याने इतर आरोपींसोबत फिर्यादी यांची ओळख करून दिली.

त्यावेळी इतर आरोपींनी त्यांचा चेन्नई येथे कंपनी असून २५ कोटी रूपयांचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखविले. कर्जाची ही रक्कम मिळवून देण्यासाठी विविध गोष्टींसाठी व आगाऊ व्याज म्हणून फिर्यादी यांच्याकडून 1 कोटी 52 लाख रूपये घेतले. मात्र, त्यानंतर देखील फिर्यादी यांना कर्ज मिळवून दिले नाही. त्यांनी वारंवार आरोपींकडे चौकशी केली. पण त्यांना कर्जाची रक्कम मिळाली नाही. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. अधिक तपास खडक पोलिस करत आहेत.