रिक्षातून अपहरण करून व्यावसायिकास लुटलं, पुण्यातील धक्कादायक घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – उच्चभ्रु समजल्या जाणार्‍या शिरोळे रस्त्यावर भरवर्दळीच्या वेळी रिक्षातून आलेल्यांनी एका व्यावसायिकाचे अपहरण करून रोकड लुटल्याची धक्कादायक घटना घडली. तसेच त्यांना कात्रज परिसरात सोडण्यात आले. त्यांच्याकडील अडीच लाखाची रोकड लुटली आहे. शनिवारी सायंकाळी हा प्रकार घडला आहे.

याप्रकरणी अँथोनी सॅबस्टिन चवरु (वय 42,रा. सोमाटणे, ता. वडगाव मावळ) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, अँथोनी यांची तनुश्री सिक्युरिटी अँड फॅसलिटी लि. नावाची कंपनी आहे. त्यांच्या कंपनीकडून सुरक्षारक्षक तसेच अन्य सेवा पुरविली जाते. बोपोडीतील भाऊ पाटील रस्त्यावर त्यांचे कार्यालय आहे.

दरम्यान, शनिवारी सायंकाळी ते कामानिमित्त पुण्यात आले होते. डेक्कन जिमखाना येथील आपटे रस्त्याजवळील शिरोळे रस्त्यावरुन ते फर्ग्युसन महाविद्यालयाकडे निघाले होते. शिरोळे रस्त्यावरील चहाच्या टपरीवर त्यांनी चहा घेतला आणि निघाले. त्यावेळी रिक्षातून आलेल्या तिघांनी चवरु यांना धमकावले. त्यांना मारहाण केली. तसेच, रिक्षात बसवून वेगवेगळ्या भागात फिरविले. त्यानंतर कात्रज भागात त्यांना सोडण्यात आले. चोरट्यांनी चवरु यांच्याकडील पिशवीत असलेली 2 लाख 53 हजारांची रोकड तसेच चष्मा, मनगटी घड्याळ, मोबाइल संच असा ऐवज काढून घेतला. कात्रजला सोडल्यानंतर त्यांनी पोलीसांकडे धाव घेतली. त्यानंतर हा प्रकार समोर आला आहे.

दरम्यान, भरदिवसा झालेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. नुकतीच शिवाजीनगर पोलीस वसाहतीसमोरच सराफ व्यावसायिकाला लुटण्यात आले होते. त्यातही घटना घडली आहे. शहरात सोन साखळी, मोबाईल चोर तसेच लुटमार करणार्‍या चोरट्यांनी हैदोस घातला आहे. काही केल्या या घटना थांबत नसल्याचे दिसत आहे. वरिष्ठ अधिकारी केवळ बैठका घेऊन पथकांकडून कारवाईच्या अपेक्षा व्यक्त करत आहेत. मात्र, ही पथके कारवाईत ढिम्म अन् इतरत्र कामात तेजीत असल्याचे दिसत आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/