Pune : उद्योजक विजय पुसाळकर यांच्याकडून पोलिस कल्याण निधीसाठी 50 लाखांची मदत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   पुण्यातील उद्योजक विजय पुसाळकर यांच्याकडून ‘पुणे शहर पोलीस दल कल्याण’विभागासाठी ५० लाख रूपयांची मदत देण्यात आली आहे. राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जायस्वाल यांच्याकडे हा धनादेश हस्तांतरीत करण्यात आला. यावेळी पोलिस दलातील कुटूंबातील पाच मुलींच्या पदवीपर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी देखील विजय पुसाळकर यांच्या ट्रस्टतर्फे घेतली जाणार असल्याचे जाहीर केले.

पुणे पोलिस आयुक्तालयात झालेल्या छोटेखानी कार्यक्रम पार पडला यावेळी हा धनादेश देण्यात आला आहे. पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, यावेळी महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष विकास काकतकर, संघटनेचे समिती सदस्य कुमार ताम्हाणे, अप्पर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, नामदेव चव्हाण, अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त, स्वप्ना गोरे, पंकज देशमुख, सुहास बावचे, संभाजी कदम, पोर्णिमा गायकवाड, शिरीष सरदेशपांडे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

पुणे शहर पोलीस दलातील सुधारणांनी मागील दोन वर्षात वेग घेतला आहे. कोरोना संसर्गाच्या संक्रमण काळात पोलीसांनी गुन्हेगारी नियंत्रणाच्या नियमित कर्तव्यासोबत पुणेकरांच्या आरोग्य सुरक्षेकरिता ढालीप्रमाणे उभे राहिले आहेत, असे यावेळी सुबोधकुमार म्हणाले. पुणे पोलीसांनी सजग नागरिक व समाजसेवी संस्था यांच्या सहकार्यातून समाजातील निराधार, दुर्बल व हतबल घटकांना सावरण्यासाठी मदतीचा देखील या कठीण प्रसंगात हात दिला.

सुबोधकुमार जायस्वाल यांनी पुणे शहर पोलीसांच्या उपक्रमांची दखल घेत कोरोना काळात पोलीसांच्या आरोग्य विषयक उचललेल्या तातडीच्या पावलांचे विशेष कौतुक केले. त्याचबरोबर त्यांनी पोलिसांनी स्वस्थ, सशक्त व सक्षम राहण्याची त्रिसूत्री स्पष्ट केली. पुणे पोलिसांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देऊन समाज रक्षणासाठी पुढे येणारा प्रत्येक पुणेकर साध्या वेशातला पोलीसच आहे, या शब्दात त्यांनी पुणेकरांचे कौतुक केले. करोना महामारीच्या काळामध्ये पोलीस दलाने विविध परिस्थितींचा सामना केला. यामध्ये वेगळ्या प्रकारची संचारबंदी, लॉकडाऊन अशा काळात पोलीस दलाने कर्तव्य बजावताना सामाजिक बांधिलकीची जबाबदारीपण बजावली.

विविध उपक्रमांतून पुणे पोलीस नागरिकांच्या प्रेम, आपुलकी व विश्वासाला पात्र ठरले आहेत. संपूर्ण जगाला हादरवून टाकणाऱ्या कोरोना महारोगाच्या संकटकाळात आपल्या जीवाची पर्वा न करता, अविरत कार्य करणाऱ्या पोलीस दलाप्रति कृतज्ञता व्यक्त करताना, त्यांना व त्यांच्या कुटूंबीयांसाठी छोटीशी मदत म्हणून पुण्यातील नामवंत उद्योगपती व इंडो शॉट्ले ऑटो पार्ट प्रा.लि.चे अध्यक्ष विजय पुसाळकर यांनी ५० लाख रूपयांचा धनादेश ‘पुणे शहर पोलीस दल कल्याण’साठी दिला आहे. विजय बी. पुसाळकर म्हणाले की, देशामध्ये कोविड-१९ या महामारीने न-भुतो न-भविष्यती अशी परिस्थिती निर्माण केली आहे. अशा अवघड व कठीण प्रसंगात पोलीस दल हे आपली जबाबदारी पार पाडतच असून त्यांनी त्यापुढेही जाऊन सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले आहे. आपले जीव धोक्यात येत असतानाही त्यांनी बजावलेली चोख कामगिरी ही वाखाणण्याजोगी आहे. त्यांच्या याच धैर्य आणि शौर्य कार्यासाठी माझ्यातर्फे छोटीशी मदत आहे. तर पोलीस दलातील पाच मुलींच्या पदवी पर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी माझ्या मी घेणार असल्याचेही जाहीर केले.

डॉ. के. वेंकटेशम् यांनीही यांनी समाजातील सगज नागरिक हा सुध्दा एक पोलीसच असतो. विविध सामाजिक आपत्तीमध्ये पोलीस दल सर्तक राहून नागरिकांचे रक्षण करत असल्याचे सांगितले. विजय पुसाळकर यांच्यासारख्या सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या उद्योगपतींकडून पोलीस दलाला मिळलेल्या या मदतीसाठी मी त्यांचा आभारी आहे. त्यांनी जो निधी दिला आहे त्याचा दलाच्या कल्याणासाठी सुयोग्य वापर करण्यात येईल.

यावेळी विजय पुसाळकर यांना पोलीस दलाच्यावतीने सुबोधकुमार जायस्वाल यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देण्यात आले. कार्यक्रमाची प्रस्तावना व पुणे शहारात पोलीस दलाने कशाप्रशारे अहोरात्र कार्य केले याचा आढावा अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी सादर केला. सुत्रसंचालन पोलीस उप-आयुक्त मितेश घट्टे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार पुणे शहर पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांनी मानले.