Pune : शुक्रवारपर्यंत सीओईपी जम्बो कोविड हॉस्पीटलमध्ये 300 रूग्णांवर उपचार होतील

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सीओईपी मैदानावरील कोव्हीड जंबो हॉस्पीटलमधील रुग्णसंख्या २५० बेडस् पर्यंत वाढविण्यात आली आहे. येत्या शुक्रवारपर्यंत ३०० रुग्णांवर उपचार करण्याची सुविधा निर्माण करण्यात येईल, अशी माहिती पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिली.

राज्य शासन आणि महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी सीओईपी मैदानावर उभारण्यात आलेले जंबो कोव्हीड हॉस्पीटल अगदी पहिल्याच टप्प्यात चर्चेत आले. गैरव्यवस्थापनामुळे हॉस्पीटल सुरू झाल्यानंतर पहिल्याच आठवड्यात येथील गोंधळी कारभार उघडकीस आल्यानंतर सर्वच स्तरांतून टीका करण्यात येत होती. परंतू याची दखल घेत प्रशासन झटून कामाला लागले आहे. वैद्यकीय व्यवस्था पुरवणारी खाजगी कंपनी बदलल्यानंतर याठिकाणी दुसरी संस्था नेमण्यात आली.

तसेच महापालिकेच्यावतीनेही वैद्यकीय स्टाङ्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे. एवढेच नव्हे तक्रारींचा विचार करून रुग्णांच्या नातेवाईकांसाठी वेटींग रुम, चांगल्या दर्जाचे अन्न तसेच, रुग्ण व नातेवाईक संवाद, बेडस् उपलब्धतेबाबत तसेच रुग्णांवर सुरू असलेल्या उपचारांबाबत माहिती देणारा डॅशबोर्ड अशा अनेक सुविधा निर्माण करण्यात आला आहे. साधारण ८०० बेडस्ची क्षमता असलेल्या या रुग्णालयात आतापर्यंत १७५ रुग्णांवरील उपचाराचीच सुविधा होती. ही सुविधा वाढून आज याठिकाणी २५० रुग्ण उपचार घेत आहेत. तर येत्या दोन दिवसांत आणखी ५० ऑक्सीजन बेडस् आणि व्हेंटीलेटरची सुविधा असलेले बेडस् सुरू करण्यात येतील, अशी माहिती रुबल अग्रवाल यांनी दिली.

हे रुग्णालय ८०० बेडस् क्षमतेचे असलेे तरी याचे व्यवस्थापनाची जबाबदारी असलेल्या पीएमआरडीएने सध्याच्या एजन्सीला ४०० बेडस्चीच वर्क ऑर्डर दिली आहे. त्यामुळे हे रुग्णालय पुर्ण क्षमतेने केंव्हा सुरु होईल, हे पीएमआरडीएचेच अधिकारी अधिकृतरित्या सांगू शकतात, असेही अग्रवाल यांनी स्पष्ट केले.