चंदननगर पोलिसांकडून 24 तासात घरफोडीचा गुन्हा उघडकीस, सव्वा पाच लाखाचा माल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  शहरात घरफोड्याचे सत्र सुरूच असताना चंदननगर पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा केवळ 24 तासात उघडकीस आणत मुद्देमालासह चोरट्याला अटक केली. सव्वा पाच लाख रुपयांचा माल नेला होता.

रोहन नितीन गदरे (वय 23, रा. टेनेट) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी राजश्री गिते (वय 30, साईनाथनगर, वडगावशेरी) यांनी चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या संगणक अभियंत्या आहेत. त्या येथील गुरूछाया रेसिडेन्सी या इमरतीत राहतात. त्यांचे पती दुसऱ्या शहरात नोकरीस असतात. दरम्यान त्यांचे आई-वडील याच परिसरात राहतात. त्यांना सलग तीन दिवस सुट्ट्या असल्याने त्या आई-वडिलांकडे गेल्या होत्या.
त्यावेळी अज्ञाताने त्यांच्या बाथरूमच्या खिडकीच्या काचा काढून आत प्रवेश केला. तसेच घरातील रोकड व दागिने असा 5 लाख 19 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. काल हा प्रकार उघडकीस आल्यानंतर चंदननगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच पाहिणी केली असता हा गुन्हा माहितगार व्यक्तीने केला असल्याचा संशय आला. कारण खिडकीचे काच न फोडता आत प्रवेश केला होता. तर पुन्हा त्या काच जश्याच तश्या लावण्यात आल्या होत्या. त्यानुसार पोलिसांनी परिसरात व इमारती संबंधित व्यक्तीकडे चौकशी सुरू केली. त्यावेळी बतमीदारामार्फत रोहन आणि तिघांचे नाव समोर आले. पोलिसांनी रोहन याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने गुन्हा केल्याचे समजले. त्याच्याकडून चोरीस गेलेला पूर्ण माल जप्त केला आहे. रोहन पूर्वी याच इमारतीत टेनंट म्हणून राहत होता, असे सहायक निरीक्षक जाधव यांनी सांगितले.