पुण्यात 50 हून जास्त घरफोड्या करणार्‍या टोळीला चंदननगर पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात घरफोडी करणाऱ्या सराईतांच्या टोळीतील एकाला चंदननगर पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून मोटार, दारुच्या बाटल्या मिळून ५७ हजारांचा ऐवज जप्त केला आहे. या टोळीने शहरासह परिसरात ५० हून अधिक गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे.

आरबाज हुसेन तलफदार (वय २०, रा. भीमक्रांतीनगर, निगडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याचा साथीदार पुरुषोत्तम राजेंद्र वीर (रा. धनगरवस्ती, नांदेड सिटी पुणे), आकाश राजेंद्र सांडभोर (रा. अंकुश चौक, निगडी ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चंदननगर परिसरातील घरफोडीचा तपास करताना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, संबंधित टोळीने विविध ठिकाणी घरफोडी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी शोध सुरू केला. त्यानंतर निगडीतील भीम क्रांतीनगर येथून त्याला ताब्यात घेतले. चौकशी केली असताना देखील पुरुषोत्तम व आकाशच्या मदतीने घरफोडी केल्याची कबुली दिली. आरबाज अत्यंत सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध पुणे आणि परिसरातील ५० चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

पोलीस उपायुक्त पंकज देशमुख, सहायक आयुक्त विजय चौधरी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर खटके, सहायक निरीक्षक गजानन जाधव, तुषार आल्हाट, अतुल जाधव, सुभाष आव्हाड, राहूल इंगळे, कुलकर्णी, येळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.