पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – एअरटेलचा आकर्षक मोबाईल क्रमांक मिळवून देण्याच्या आमिषाने एका वकिलाला १ लाख ११ हजार १११ रुपयांना गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. २९ सप्टेंबरमध्ये 2019 मध्ये हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी राजेश रंगनाथ खळदकर (वय ४५, रा. धनकवडी) यांनी सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश व्यवसायाने वकिल आहेत. ते धनकवडी परिसरात राहायला आहेत. २९ सप्टेंबर दिवशी त्यांना घरी असताना एकाने त्यांना फोन केला. भारती एअरटेल कंपनीचा आकर्षक क्रमांक मिळवून देण्याचे अमिश दाखवून विश्वास संपादन केला. त्यासाठी त्यांना स्वतःचे बँक खाते भारती एअरटेल कंपनीचे असल्याचे भासविले.
त्यानंतर राजेशने आकर्षक क्रमांक मिळविण्यासाठी चोरट्याच्या बँकखात्यात ऑनलाईनरित्या १ लाख ११ हजार १११ रुपये जमा केले. रक्कम जमा करुनही आकर्षक क्रमांक मिळाला नाही. त्यावेळी फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. अधिप तपास पोलीस निरीक्षक विजय पुराणिक हे करीत आहेत.