Pune : लष्करात कॅम्प प्रमुख असल्याचं सांगून महिलेनं मेस व्यावसायिकास घातला गंडा

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – लष्करात कॅम्प प्रमुख असल्याचे सांगत एका महिलेने जेवण मागविण्याच्या बहाण्याने मेस व्यावसायिकास 9 हजार रुपयांना गंडा घातला आहे. हा प्रकार 9 जून 2020 रोजी घडला आहे.

याप्रकरणी सुनिता गोपाळ जाडकर (48, रा. कल्पक सोसायटी, डहाणुकर कॉलनी, कोथरूड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची खानावळ आहे. कोथरुड येथे त्या खानावळ चालवतात. त्यांना 9 जून रोजी एका अनोळखी महिलेने फोन केला. तसेच लष्कराच्या कॅम्पची प्रमुख असल्याचे सांगितले. त्यांचा विश्वास संपादन केला. तसेच 15 लोकांसाठी जेवण पाहिजे असल्याची मागणी केली. त्यानुसार ऑनलाइन व्यवहार करण्याच्या दृष्टीने महिलेनी फिर्यादी यांना ओटीपी सांगून त्याआधारे 8 हजार 888 रुपये ऑनलाइन काढून घेत फसवणूक केली.