Pune : मध्यवस्तीमधील 4 मजली इमारत विक्रीच्या बहाण्याने 4 कोटी 80 लाखांची फसवणूक; आंदेकर व घिसाडी गँगची धमकी देत 3 कोटींच्या खंडणीची मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मध्यवस्तीमधील चार मजली इमारत विक्री करण्याचा बहाणाकरून 4 कोटी 80 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. तर, आंदेकर व घिसाडी गँगची धमकी दाखवत 3 कोटींची खंडणी देखील मागितली आहे. आता पोलिसांनी अर्ज चौकशीवरून तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी रामचंद्र मुलतानी (वय 72) यांनी खडक पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, अशोक आत्माराम शर्मा, सीमा अशोक शर्मा व हेमंत आत्माराम शर्मा यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. यातील हेमंत शर्मा यांचा मृत्यू झालेला आहे. सर्व प्रकार 2016 ते 2021 या कालावधीत घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व अशोक शर्मा यांचे व्यापारी संबंध आहेत. त्यामुळे ते एकमेकांना ओळखतात. दरम्यान फिर्यादी यांना आरोपीनी गणेश पेठेतील बोरुडी पूल येथील 143.81 चौरस मीटर जागा व त्यावर उभी असलेली चार मजली इमारत विक्री करण्याचा बहाणा केला. फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. तसेच त्यापोटी 4 कोटी 80 लाख रुपये घेतले. पण त्यांना जागा विक्री केली नाही. तसेच त्यांचे पैसे देखील परत केले नाही. तर यानंतर त्यांनाच आंदेकर व घिसाडी गँगची धमकी देत आणखी 3 कोटी रुपयांची खंडणी मागितली. याबाबत फिर्यादी यांनी पोलिसांकडे तक्रार अर्ज केला होता. या अर्जाची चौकशी करण्यात आली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलिसांनी म्हंटले आहे. अधिक तपास खडक पोलीस करत आहेत.