लॉकडाऊनमध्ये गावी जाण्यासाठी पास काढून देण्याच्या बहाण्याने फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  लॉकडाऊनमध्ये गावी जाण्यासाठी पोलिसांचा पास काढून देण्याच्या बहाण्याने एका महिलेने पाच हजार रुपये घेऊन फसवणूक केली असल्याची घटना समोर आली आहे. हा सर्व प्रकार २२ ते २६ मे या 4 दिवसांच्या कालावधीत घडला आहे.

याप्रकरणी पुष्पा विठ्ठल मंदारे (रा. कामधेनू इस्टेट, हडपसर) या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी राजेशकुमार शामाचरण गौतम (वय ४० रा. हडपसर, मूळ- उत्तरप्रदेश) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाउन शिथिल करण्यात आल्यामुळे परप्रांतीय प्रवाशांना मूळगावी जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, त्यासाठी पोलिसांचा पास काढणे बंधनकारक आहे. २२ मे ला राजेशकुमार आणि त्यांचे इतर चार मित्र हडपसर परसिरात थांबले होते. त्यांना मूळगावी उत्तरप्रदेशात जायचे होते. मात्र, त्यांच्याकडे पास नसल्यामुळे त्यांना प्रवास करता येणार नव्हता. त्यावेळी तिथे आलेल्य पुष्पाने त्यांना पोलिसांचा पास काढून देते, सांगत प्रत्येकी एक हजार रुपये मिळून पाच हजार रुपये घेतले. त्यांच्याकडून फॉर्म भरुन घेउन पैसे घेत पोलिसांचा पास काढून न देता फसवणूक केली. दरम्यान काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर परराज्यात व जिल्ह्यात जाण्याचा पास 100 रुपयांत काढून देण्यात येईल असा मेसेज व्हायरल झाला होता. त्यावेळेस पोलीसांनी याचा तपास सुरू केला होता. परंतु अद्याप सायबर विभागाला हा मेसेज कोणी व्हायरल केला हे समजलेले नाही.