डॉक्टर महिलेची 90 हजाराची फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – ओएलएक्‍सवर सोपा व खुर्ची विकणे चांगलेच महागात पडले असून, डॉक्टर महिलेला एकाने वस्तू खरेदी करण्याच्या बहाण्याने ९० हजार रुपयांचा गंडा घातला. या प्रकरणी वानवडी भागातील ३९ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरुध्द  फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना घरातील जुना सोफा व खुर्ची विक्री करायचा होता. त्यासाठी त्यानी याचे फोटो ओएलएक्‍सवर टाकून विक्रीची जाहिरात केली. ओएलएक्स वरील जाहिरात पाहून एका सायबर चोरट्याने त्यांना फोन केला. त्याला सोफा व खुर्ची खरेदी करायची असल्याचे सांगितले. त्यासाठी त्याची किंमत देखील ठरली. त्यावेळी आरोपीने त्यांना ऑनलाईन पैसे पाठवितो, असे सांगितले.

आरोपीने त्यांना क्युआर कोड पाठविला. तो स्कॅन केल्यानंतर पैसे मिळतील, असे सांगितले. त्यामुळे महिलेने तो कोड स्कॅन केला. पण फिर्यादी यांच्याच बँक खात्यातून ५० हजार कमी झाले. हा प्रकार समजल्यानंतर महिलेने त्या व्यक्तीला फोन करून पैसे कमी झाल्याचे सांगितले. त्यावेळी आरोपीने चुकून प्रकार झाल्याचे सांगत दुसरा क्युआर कोड पाठविला. महिलेने तो देखील स्कॅन केल्यानंतर महिलेच्या खात्यामधील आणखी ४० हजार रुपये कमी झाले. त्यावेळी फसवणूक झाल्याचे लक्षात आले. अधिक तपास पोलिस निरीक्षक सलीम चाऊस हे करत आहेत.