रेल्वे तिकीट मिळवून देण्याच्या बहाण्याने फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – परराज्यातील कामगारांना मूळगावी जाण्यासाठी रेल्वे तिकिट मिळवून देण्याचे आमिष दाखवून पैसे घेऊन पसार झालेल्यास गुन्हे शाखेने अटक केली. पुणे रेल्वे स्थानक परिसरात त्याने कामगारांकडून पैसे उकळले. दिनेश ब्रिजराज सिंग (वय ३६,रा. ससून रस्ता, पुणे स्टेशन परिसर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील वास्तव्यास असलेले परराज्यातील कामगार, मजूर गावी जात आहेत. केंद्र शासनाकडून श्रमिक रेल्वे गाडी सुरू करण्यात आली आहे. पोलीसांकडून गावी जाणाऱ्या मजुरांच्या नोंदी करून त्यांना गावी पाठविण्यात येत आहे. शुक्रवारी (२९ मे) पुणे रेल्वे स्थानकावरून हावड्याला श्रमिक गाडी रवाना होणार होती.

त्यावेळी सिंगने गावी जाणाऱ्या नागरिकांना रेल्वे स्थानक परिसरात गाठले. तसेच आरक्षित रेल्वे तिकिट मिळवून देतो, असे आमिष दाखवून त्याने काही जणांकडून दीड ते दोन हजार रुपये उकळले. त्यानंतर सिंग तेथून पसार झाला. याप्रकरणी या कामगारांनी पोलिसांना याबाबत तक्रार दिली होती. त्यासानुसार पोलीस त्याचा शोध घेत होते. दरम्यान माहिती गुन्हे शाखेच्या युनिट दोनला सिंग हा रेल्वे स्थानक परिसरात आल्याचे समजले. त्याला येथे सापळा लावून पकडण्यात आले.