पुण्यात Paytm ची KYC करून देण्याच्या बहाण्याने घातला गंडा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   शहरातील सायबर गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून, आज पुन्हा एकास तुमच्या मोबाईलवरील पेटीएम केवायसी सस्पेंड झाले असून, तुम्ही आमच्याशी संपर्क साधा असा मेसेज पाठवून सायबर चोरट्यानी फसवणूक केली. 44 हजार रुपये त्यांच्याकडून उकळण्यात आले.

याप्रकरणी योगेश शहा (वय ५५, रा. बिबवेवाडी ) यांनी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आयटी ऍक्ट व फसवणुकीच्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहा एका कंपनीत नोकरीस आहेत. त्यांचे पेटीएमवर अकाउंट आहे. काही महिन्यांपुर्वी त्यांना मोबाईलवर पेटीएम अ‍ॅपची केवायसी सस्पेंड झाल्याचा मेसेज आला होता. त्यानुसार त्यांनी संबंधिताला फोन केला असता, त्यांनी शहा यांना क्वीक सपोर्ट अ‍ॅप डाउनलोड करण्यास सांगितले. सायबर चोरट्याने सांगितल्यानुसार शहा यांनी प्रक्रिया केली असता, त्यांच्या बँक खात्यातून २५ हजार रुपये कमी झाले. त्यानंतर काही वेळाने १० हजार आणि ९ हजार मिळून ४४ हजार रुपये ऑनलाईनरित्या कमी झाल्याचा मेसेज त्यांना आला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. अधिक तपास बिबवेवाडी पोलीस करत आहेत.