पुण्यासह जिल्ह्यातील आमदारांचा स्विह सहाय्यक असल्याचे सांगत फसवणूक

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या काळात खाद्य किट देण्याचा बहाणाकरून पुण्यासह जिल्ह्यातील आमदारांचा स्विह सहाय्यक असल्याचे सांगत एका औरंगाबाद येथील भामट्याने शहरातील अनेकांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्या नागरिकांना किट घेऊन जाण्यासाठी टेम्पोचे भाडे द्यावे म्हणून त्यांच्याकडून पैसे घेऊन फसविले आहे.

याप्रकरणी संदीप काळे (वय 30, दांडेकर पूल) यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या काळात गेली दोन ते अडीच महिना देश लॉकडाऊन होता. यावेळी अनेकांवर उपासमारीची वेळ आली होती. त्यावेळी अनेक स्वयंसेवी संस्था, लोकप्रतिनिधी आणि दानशूर व्यक्तीने खाद्य पदार्थ आणि साहित्याचे किट वाटले होते. त्याचाच फायदा या भामट्याने घेतला आहे.

फिर्यादी काळे यांना आरोपीने फोन केला. मी मावळच्या आमदारांचा स्विय सहाय्यक बोलत असून, तुम्हाला 3 हजार किट द्यायचे आहेत. त्यासाठी टेम्पो भाडे द्यावे लागेल असे सांगून त्यांना साडे पाच हजार रुपये पाठवण्यास सांगितले. त्यांनी पैसे पाठविले. पण त्यांना कोणतीही किट मिळाले नाहीत. त्यावेळी फसवणूक झाली असल्याचे लक्षात आले. त्यांनी चौकशी केल्यानंतर असे काही कित देण्यासाठी फोन केला नसल्याचे माहिती मिळाली. मग त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान आरोपी हा औरंगाबाद येथील आहे. त्याची मुलगी आजारी होती. त्यावेळी त्याला काही आमदारांनी मदत केली होती. त्यावेळी त्याने त्यांच्यासोबत फोटो काढले होते. ते फोटो त्याने सोशल मीडियावर टाकले होते. त्यामुळे त्याच्यावर विश्वास बसला आहे. दरम्यान औरंगाबाद येथील त्याच्या घरी जाऊन चौकशी करण्यात आली आहे. त्यावेळी तो घरी राहत नसून तो कुटुंबियांना देखील सांभाळत नसल्याचे समोर आले आहे. त्याने अश्या प्रकारे अनेकांना फसविले असल्याचे देखील प्राथमिक तपासात समोर आले आहे. अनेकांकडून त्याने 6 हजार, कोणाकडून 16 हजार असे पैसे घेतले आहेत. त्याचा शोध घेण्यात येत असल्याचे सहायक निरीक्षक एन. आर. केंचे यांनी सांगितले.