27 वर्षीय महिलेची 11 लाख 76 हजारांची फसवणूक

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन – उच्चशिक्षीत एका महिलेला परदेशात लागणारे ऑईल भारतात स्वस्त दरात खरेदीकरून परदेशात विक्री केल्यानंतर मोठा नफा मिळण्याचे अमिष दाखवत 11 लाख 76 हजार रुपयांना गंडा घालण्यात आल्याचा प्रकार उजेडात आला आहे.

याप्रकरणी 27 वर्षीय महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, इंटरनॅशनल मोबाईल क्रमांकधारक व इतरांविरोधात आयटी अ‍ॅक्ट, फसवणूकीसह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या खासगी कंपनीत नोकरीस आहेत. दरम्यान, त्यांना ऑक्टोंबर 2019 मध्ये एका इंटरनॅशनल मोबाईल क्रमांकावरून फोन आला. तसेच, त्यांना इंग्लडमधील एका फार्मासिस्ट कंपनीला अँटि वायरल व रेट्रो वायरल (लसीकरण) साठी हर्बल इंग्रेडिएंट्स ऑडियो चिकिरा रॉ या ऑईलची आवश्यक्ता असते. परंतु, हे ऑईल युएसमध्ये खूप महाग आहे. हेच ऑईल भारतात स्वस्त दरात मिळते, असे सांगत त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांना हे ऑईल भारतात अडीच हजार युएस डॉलरमध्ये खरेदी करा. त्यानंतर हेच ऑईल आम्हाला 5 हजार युएस डॉलरला विक्री करू शकता. यामाध्यमातून मोठ्या प्रमाणात नफा मिळेल असे सांगितले. त्यांचा विश्वास संपादन केल्यानंतर नफ्यामध्ये 60 टक्के तुम्हाला आणि कमिशन म्हणून 40 टक्के आम्हाला द्यावे लागतील असे सांगितले.

त्यानंतर त्यांना हे ऑईल खरेदी करण्यास सांगितले. त्यानंतर वेगवेगळी कारणे सांगून त्यांना 11 लाख 76 हजार रुपये भरण्यास भाग पाडले. पैसे भरल्यानंतरही त्यांना कमिशन किंवा त्यांचे ऑईल विक्री झाले नाही. त्यावेळी त्यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. यानंतर त्यांनी पोलीसांकडे तक्रार दिली होती. या तक्रार अर्जाची चौकशी करण्यात आली. त्यात फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हडपसर पोलीस करत आहेत.