पुण्यात गृहकर्जाच्या आमिषाने 12 नागरिकांची लाखोंची फसवणूक

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन – गृहकर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून एकाने पुण्यातील तब्बल 12 नागरिकांची फसवणूक केली आहे. त्याने या नागरिकांकडून वेगेवगळ्या कारणांनी तब्बल 15 लाख 46 हजार रुपये उकळले आहेत. ऑक्टोबर 2019 ते फेबु्रवारी 2020 या कालावधीत हा प्रकार घडला आहे.
याप्रकरणी प्रकाश पिंगळे (वय 36, रा. पिंपळे-निलख) यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, शाम राठोड असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्केटयार्ड परिसरात राठोड याचा गाळा आहे. तेथे त्याचे तिरुपती बालाजी फायनान्स नावाचे कार्यालय आहे. दरम्यान, फिर्यादींना गृहकर्जाची आवश्यक्ता होती. त्याचवेळी आरोपीबाबत माहिती मिळाली. यामुळे त्यांच्याशी संपर्क साधला. यावेळी त्याने गृहकर्ज मिळवून देतो अशी बतावणी केली. पिंगळे यांच्यासोबतच आणखी 11 नागरिकांना त्याने गृहकर्ज मिळवून देण्याचे सांगितले. त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांच्याकडून वेगवेगळ्या फीच्या नावाखाली एकूण 15 लाख 46 हजार रुपये स्वीकारुन कर्ज न देता फसवणूक केली. अधिक तपास पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद करीत आहेत.