पुणे : आयुर्विमा पॉलिसी काढून देण्याच्या बहाण्यानं 17 लाखाची फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – आयुर्विमा पॉलीसी काढून देण्याच्या आमिष दाखवत एका महिलेला सायबर चोरट्यांनी 17 लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी 55 वर्षीय महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या येरवडा परिसरात राहण्यास आहेत. त्यांनी खासगी विमा कंपनीची पॉलीसी काढली होती. सहा वर्षांपूर्वी महिलेच्या मोबाइल क्रमांकावर एकाने संपर्क साधला होता. नवीन पॉलीसी काढल्यास फायदा होईल तसेच जुनी पॉलीसी बंद करावी लागेल, अशी बतावणी केली.

त्यांचा विश्वास संपादनकरून वेगवेगळ्या चार्जेससाठी महिलेला वेळोवेळी पैसे भरण्यास सांगितले. पॉलीसीच्या हप्त्यापोटी महिलेने गेल्या सहा वर्षांत 16 लाख 91 हजार रुपये ऑनलाइन पद्धतीने एका बँक खात्यात जमा केले. महिलेने याबाबत नुकतीच चौकशी केली. तेव्हा खासगी विमा कंपनीकडून महिलेच्या नावाने कोणतीही पॉलीसी उतरविण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले.

फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी चौकशी केली. त्यानंतर माहिती – तंत्रज्ञान कायदा तसेच फसवणूक या कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनुस शेख तपास करत आहेत.