OLX वर ड्रोन कॅमेर्‍याची जाहिरात, घातला 2 लाखाला गंडा

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन – ओएलएक्स या संकेतस्थळावर कमी किंमतीत ड्रोन कॅमेरा देण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्याने तरुणाला दोन लाख रुपयांना गंडा घातला. 4 ते 8 नोव्हेंबरमध्ये वडगाव शेरीत ही घटना घडली. याप्रकरणी शिवम महातो (वय 26, रा. वडगाव शेरी, मूळ-झारखंड) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञाताविरोधात आयटी अ‍ॅक्ट व फसवणूकीनुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवम मूळचे झारखंडमधील आहेत.नोकरीनिमित्त पुण्यात असून, ते राहण्यास वडगाव शेरीत आहेत. त्यांना फोटोग्राफीचा छंद आहे. त्यामुळे त्यांना ड्रोन कॅमेरा खरेदी करायचा होता. त्यासाठी शिवमने ओएलएक्स साईटवर ड्रोन कॅमेर्‍याची पाहणी केली. त्यावेळी सायबर चोरट्याने त्यांना अतिशय कमी किंमतीत देण्याची बतावणी केली. त्यासाठी वेळोवेळी रक्कम स्वीकारुन 1 लाख 96 हजार रुपये स्वतःच्या बँकखात्यात वर्ग करुन घेतले. रक्कम स्वीकारुनही ड्रोन कॅमेरा मिळाला नाही. त्यावेळी त्यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. अधिक तपास पोलीस निरीक्षक अजय वाघमारे हे करत आहेत.