Pune : ‘देवर फायनान्स’ नावाने ऑफिस उघडून कर्ज देण्याच्या बहाण्याने 27 जणांना 3.7 लाखांचा गंडा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   “देवर फायनान्स” नावाने ऑफिस उघडून त्याद्वारे 27 नागरिकांना 2 लाख रुपयांचे लोन देण्याच्या बहाण्याने 3 लाख 77 हजार रुपयांना फसविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी विश्वराज जयदेव देवर (वय 35, रा. उंड्री) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत राजू थोरात (वय 51) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने येथील सिक्रेट हार्ट टाऊन मॅकडोलॅन्डच्या दुसऱ्या मजल्यावर देवर फायनान्स नावाने ऑफिस सुरू केले. तो कोणत्याही बँकेचा अधिकृत परवाना नसताना तसेच तो बँकेचा अधिकारी नसताना त्याने फिर्यादी यांच्या पत्नीला 2 लाख रुपयांचे लोन देतो असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यांच्याकडून काही खर्च म्हणून 13 हजार घेतले. तर त्यांच्यासोबत इतर 27 जणांना देखील त्याने अश्याच प्रकारे प्रत्यकाकडून 13 हजार असे एकूण 3 लाख 77 हजार रुपये घेतले. मात्र त्यातील एकाला देखीक त्याने लोन दिले नाही. तो पसार झाल्यानंतर त्यांना फसवणूक झाली असल्याचे लक्षात आले. यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्याचा शोध घेऊन त्याला अटक केली. अधिक तपास वानवडी पोलीस करत आहेत.