पुण्यात औषध विक्रेत्याला 50 लाखाचं आमिष दाखवून 3 लाखाचा गंडा

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन – सातार्‍यातील एका आयुर्वेदिक औषध विक्रेत्याला जादूटोणाद्वारे राईस पुलरच्या (तांब्याचे भांडे) माध्यमातून 40 ते 50 लाख रुपये देण्याचे अमिषाने 3 लाख रुपयांना गंडा घालण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.

नुरएईलाही अजिज शेख (वय 32, रा. कोंढवा), आसीफ अजिमद्दीन खान (वय 41, रा. नाना पेठ), रियाज ईब्राहिम खान (वय 25, रा. मिठानगर, कोंढवा खुर्द), महेश महादेव ननावरे (वय 29, रा. भैरवनाथ आळी, कोंढवा), इम्रान नुरमहमंद पठाण (वय 30, रा. गांधी चौक, हडपसर) असे अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी 49 वर्षीय व्यक्तीने लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, फसवणूक, महाराष्ट्र नरनबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समुळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम 2013 कलम 3(2) या कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीे हे सातार्‍या जिल्ह्यातील वाई येथील आहेत. आयुर्वेदिक औषध विक्री करत असे. काही वर्षांपुर्वी ते पुण्यात राहत होते. त्यावेळी त्यांची व आरोपींची ओळख झाली होती. दहा दिवसांपुर्वी काही कामानिमित्त पुण्यात आले होते. त्यावेळी आरोपींनी त्यांना जादुटोणाच्या माध्यमातून राईस पुलर (ताब्यांचे भांडे, त्यातून तांदळाचे कन टाकल्यानंतर पैसे मिळतात) बनवून देतो. त्यासाठी 3 लाख रुपये दे, त्याबदल्यात तुला 40 ते 50 लाख रुपये देऊ असे अमिष दाखवून विश्वास संपादन केला. त्यानंतर 3लाख घेऊन काहीही न करता फसवणूक केली. त्यानंतर त्याने पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखलकरून पाच जणांना अटक केली.

अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) अरूण हजारे हे करत आहेत.