Paytm अपडेटच्या बहाण्यानं पावणे चार लाखांना घातला गंडा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पेटीएमचे केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी जेष्ठाला पावणे चार लाखांचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. 4 जानेवारी रोजी हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी 77 वर्षीय व्यक्तीने कोथरुड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जेष्ठ नागरिक खासगी कंपनीतून सेवानिवृत्त झाले आहेत. काही महिन्यांपुर्वी त्यांनी ऑनलाईन व्यवहार करण्यासाठी पेटीएम अ‍ॅप डाउनलोड केले आहे. 4 जानेवारीला सायबर चोरट्याने त्यांना फोन करुन पेटीएमचे केवायसी अपडेट करण्याचे सांगितले. त्यासाठी त्याने फिर्यादींना बँक खात्याची सर्व गोपनीय माहिती विचारून घेतली.

तसेच, त्यांना आलेला एक ओटीपी क्रमांक देखील विचारला. त्यांनी ओटीपी सांगितल्यानंतर बँक खात्यामधून 3 लाख 74 हजार रूपये ऑनलाईनरित्या काढून घेतले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ पोलिसांकडे तक्रार दिली आहे. अधिक तपास कोथरूड पोलीस करत आहेत.