OLX वर फर्निचर विक्रीची जाहिरात देणं पडलं महाग, 30 हजाराचा बसला ‘फटका’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – ओएलएक्सवर फर्निचर विक्रीची जाहिरात देणे एका महिलेला चांगलेच महागात पडले असून, सायबर चोरट्यांनी 30 हजार रुपयांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी 24 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार, चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात सायबर चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला बाणेर परिसरात राहते. त्यांना घरातील बेड व इतर फर्निचर विकायचे होते. त्यासाठी त्यांनी ओएलएक्सवर फर्निचरबाबतची माहिती दिली.

गेल्या महिन्यात अज्ञाताने महिलेने जाहिरातीत दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधला. फर्निचर खरेदी करायचे आहे, अशी बतावणी केली. त्यानंतर अज्ञाताने महिलेला संदेश पाठविला. त्या संदेशात ‘क्यूआर कोड’ (विशिष्ट क्रमांक) दिला. महिलेला क्यूआर कोड स्कॅन करुन तो पेटीएम खात्यात टाकावा, असे सांगितले. महिलेने क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर अज्ञाताने तिच्या बँक खात्यातून 30 हजार 618 रुपये काढून घेतले. ही रक्कम त्याने एका बँक खात्यात जमा केली. फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर तिने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक अनिल शेवाळे हे करत आहेत.