‘ऑनलाइन’ मैत्री झाल्यानंतर ‘तिनं’ लस तयार करण्याच्या आमिषानं पुण्यातील बडया व्यावसायिकाला 38 लाखाचा गंडा

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – फेसबुकवर ओळख झाल्यानंतर एका महिलेने लस निर्मिती करण्याचे काम सुरू असून, त्यासाठी लागणारे आवश्यक ऑईल भारतात मिळत असल्याने त्यात मोठ्या प्रमाणात फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवून पुण्यातील एका व्यवसायिकाची 38 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.

याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात किशोर नावंदर (वय 48) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार इंटरनॅशनल मोबाईल धारक आणि खातेधारक यांच्यावर फसवणूक, आयटी ऍक्टसह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी याचा 2006 पासून रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे. दरम्यान ते काही बिझनेस करता येईल का याच्या शोधत होते. यावेळी त्यांना फेसबुकवर एका परदेशातील महिलेची फ्रेंड रिकव्हेस्ट आली. ती त्यांनी स्वीकारली. त्यानंतर महिलेने मी एका मोठ्या औषध निर्मिती करणाऱ्या कंपनीत काम करत असल्याचे सांगितले. तसेच सध्या एका लसीवर काम सुरू असून, त्याची प्राणी आणि मानवावर चाचणी घेण्यात येत आहे. मात्र त्यासाठी लागणाऱ्या ऑईलची अत्यंत गरज आहे. ते भारतात मिळते. कंपनीला ते आवश्यक आहे.

भारतातील डीलर असून त्याच्याकडून तुम्ही ते ऑईल घेऊन कंपनीला दिल्यानंतर मोठ्या प्रमाणात फायदा होईल असे सांगितले. प्रति लिटर ऑइल 60 हजार रुपये आहे. त्याचवेळी भारतातील त्या व्यक्तीचा संपर्क क्रमांक दिला. फिर्यादीनी संपर्क साधून याबाबत माहिती घेतली. तसेच त्याच्याकडून 4 लिटर ऑइल घेतले. तसेच पुन्हा महिलेला संपर्क केला. तिने संबंधित कंपनीमधील अधिकाऱ्याचा क्रमांक दिला. त्यांच्यात बोलने झाले. यावेळी त्यांना दिल्लीत बोलावले. एका हॉटेलात फिर्यादी थांबले असता त्यांच्याकडे एकजण आला. त्याने हे ऑइल नेले. काही दिवसांनी कंपनीच्या त्या व्यक्तीचा फोन आला. त्याने ऑइल मिळाले असून अजून लागणार असल्याचे सांगितले. तसेच त्यांच्याकडून वेगवेगळ्या प्रकारचे कारणे देऊन एकूण 38 लाख 55 हजार रुपये उकळले. आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर याची प्राथमिक चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे पोलीस निरीक्षक (गुन्हे) सय्यद यांनी सांगितले. हा सर्व प्रकार फेब्रुवारी 2020 ते मे 2020 या कालावधीत घडला आहे. अधिक तपास स्वारगेट पोलीस करत आहेत.