पुण्यात फायनान्स कंपनीला 39 लाखांचा गंडा, महिलेसह दोघांविरूध्द गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –    फायनान्स कंपनीकडून घेतलेले कर्ज न फेडता दोघांनी परस्पर सहा फ्लॅटची विक्री करुन कंपनीला तबल ३८ लाख ४७ हजार रुपयांना गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. डिसेंबर २०१७ ते जून २०२० कालावधीत ही घटना गणेशखिंड रस्त्यावरील इंडिया बुल्स कंपनी कार्यालयात घडली.

वैशाली पंकज येवले रा. चिंचवड आणि सुरेश कुंडलिक थिरुडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी समीर कचोरी (वय ४४, रा. उंड्री ) यांनी चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बांधकाम प्रकल्पासाठी थिरुडे यांनी इंडिया बुल्स हाउसिंग फायनान्स कंपनीकडून डिसेंबर २०१७ मध्ये १ कोटी ७५ लाखांचे कर्ज घेतले होते. त्यासाठी त्यांनी प्रकल्पातील सहा फ्लॅट फायनान्स कंपनीकडे तारण ठेवले. त्यानंतर त्यांनी काही महिने कर्जाचे हप्ते नियमितपणे भरले.

मात्र, फसवणूक करण्याच्या हेतूने येवले आणि थिरुडे यांनी इंडिया बुल्स फायनान्स वंâपनीचे ना हरकत प्रमाणपत्र न घेता सहा फ्लॅटची परस्पर विक्री करुन ३८ लाख ४७ हजारांची फसवणूक केली. याप्रकरणी पोलिस निरीक्षक माया देवरे अधिक तपास करीत आहेत.