पुणे : JCB मशीन विक्रीच्या बहाण्याने चार लाखांचा गंडा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – जेसीबी मशीन विक्री करण्याच्या बहाण्याने दाम्पत्याने तरुणाला ४ लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. २०१९ ते मार्च २०२० या कालावधीत हा प्रकार कोंढव्यातील खडीमशीन चौकात रॉयल अ‍ॅटो फायनान्स कार्यालयात घडली.

तुकाराम उर्फ बापू खांडेकर आणि पूनम तुकाराम खांडेकर दोघेही (रा. मेरुधर सोसायटी, कात्रज-कोंढवा ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अजय राजाराम सपकाळ (वय ४३, रा. चांढवे, महाड ) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय मूळचे रायगड जिल्ह्यातील चांढवे गावचे रहिवाशी आहेत. त्यांना व्यवसायासाठी जेसीबी मशीन खरेदी करायचा होता. त्यानुसार त्यांनी ओएलएक्स बेवसाईटवरुन माहिती घेउन तुकाराम खांडेकर यांच्याशी संपर्क केला. त्यानंतर व्यवहारासाठी तुकाराम याने अजयला पुण्यातील कात्रज -कोंढवा रस्त्यावरील रॉयल अ‍ॅटो फायनान्स कार्यालयात बोलाविले. त्याठिकाणी २०१५ मध्ये तुकाराम, पूनम आणि अजय यांच्यात जेसीबी खरेदी-विक्रीचा व्यवहार १५ लाखांना ठरला होता.

त्यानुसार अजयने तुकाराम यांना ५० हजार रुपये रोख दिले. त्यानंतर साडेतीन लाख बँकेतून आरटीजीएस द्वारे तुकाराम यांच्या बँकखात्यात वर्ग केले. आगाउ रक्कम देउनही तुकाराम आणि पूनम यांनी अजयला जेसीबी मशीनची विक्री केली नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर अजयने कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक एन. एस. चव्हाण अधिक तपास करीत आहेत.