छत्रपती संभाजी महाराजांच्या सेवकाच्या वंशजाची 4 लाखांची ‘फसवणूक’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – छत्रपती संभाजी महाराजांचे अंत्यविधी करणाऱ्या वंशजांना सायबर चोरट्यांनी चार लाखांचा गंडा घातला. वीर शिदनाक ग्रामविकास फाउंडेशनला पुण्यात जागा मिळवून देण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्याने फसवणूक केली. ही घटना जानेवारी ते जुलै २०१८ कालावधीत वढू बुद्रुकमध्ये घडली. याप्रकरणी राजेंद्र गायकवाड (वय ५८, रा. वढू, बुद्रुक) यांनी दत्तवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र गायकवाड हे वढू बुद्रुक गावातील असून त्यांच्या पुर्वजांनी छत्रपती संभाजी महाराजांचा अत्यंविधी केला होता. दरम्यान, गायकवाड यांच्या वीर शिदनाक ग्रामविकास फाउंडेशनला त्यांना जागा मिळविण्यासाठी गायकवाड यांच्याकडून पाठपुरावा सुरु आहे. असे असताना जानेवारी २०१८ मध्ये एकाने त्यांना संपर्क केला. संबंधिताने गायकवाड यांना सूर्यवंशी असे नाव सांगत मुंबईत उच्च पदावर कामावर असल्याचे सांगितले.

गायकवाड यांच्या संस्थेला पुण्यात जागा मिळवून देण्याचे सांगत संबंधिताने ऑनलाईनरित्या रक्कम जमा करण्यास सांगितली. त्यानुसार गायकवाड यांनी ऑनलाईनरित्या चार लाख रुपये जमा केले. मात्र, रक्कम जमा करुनही जागा न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे गायकवाड यांच्या लक्षात आले. याप्रकरणी पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे अधिक तपास करीत आहेत.