व्यावसायिकास 50 लाखाचा ‘गंडा’, पुण्यातील डेक्कनमध्ये महिलेसह 5 जणांवर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – डेक्कन भागातील एका व्यावसायिकाला 50 लाखांचे स्टील देण्याचे अमिष दाखवून गंडा घालण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. एका महिलेसह पाच जणांनी संगणमतकरून त्यांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

याप्रकरणी चंद्रशेखर ओगले (वय 57, रा. नवी पेठ) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, राजेश मेवावाला, राखी अग्रवाल, हिरेन बुथ, आशिष शहा, मासुमी मेवावाला यांच्याविरोधात फसवणूकीसह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे व्यावसायिक असून, त्यांचे डेक्कन परिसरात ऑफिस आहे. ते फॅक्टरी उभाकरून देण्याचे कॉन्ट्रेक्ट घेतात. दरम्यान, संशयित आरोपींची आणि त्यांची ओळख होती. त्यावेळी त्यांनी फिर्यादींचा विश्वास संपादन केला. तसेच, आशिष शहा हे स्टील देऊ शकत नाहीत, हे माहित असताना त्यांना अशिष शहा हे 50 लाख रुपयांचे स्टील देणार असल्याचे सांगत त्याबाबतचे प्रपोजल फिर्यादींना पाठविले.

तसेच, त्यांना शहा यांच्या खात्यावर 50 लाख रुपये भरण्यास भाग पाडले. मात्र, त्यानंतर फिर्यादींना स्टील दिले नाही. यानंतर फिर्यादींनी त्यांना पैशांबाबत विचारणा केली असता त्यांना पैसे परत देतो, असे सांगितले. अनेक दिवस वाट पाहिल्यानंतरही त्यांनी पैसे दिले नाहीत. तसेच, पैसे देण्यास टाळाटाळ करण्यास सुरूवात केली. त्यावेळी त्यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. यावेळी त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. त्यानंतर पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास डेक्कन पोलीस करत आहेत.