लॉटरी लागल्याचे सांगत महिलेला 75 हजारांचा गंडा

पुणे :  पोलीसनामा ऑनलाइन  –   लॉकडाऊन काळात रस्त्यावरील गुन्हेगारी कमी झाली असली तरी सायबर गुन्हेगारी मात्र तेजीत आहे. महिलेला लॉटरी लागल्याचे सांगत सायबर चोरट्यांनी 75 हजारांचा गंडा घातला आहे. २७ एप्रिल दरम्यान ही घटना घडली आहे.

याप्रकरणी 55 वर्षीय महिलेने येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आयटी ऍक्ट व फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला खासगी कंपनीत कामाला आहेत. त्यांचे फेसबुकवर खाते आहे. सायबर चोरट्यांनी २७ एप्रिलला फिर्यादी महिलेला मैत्रिणीच्या नावाने फेसबुकवर लॉटरी लागल्याचा मेसेज पाठविला. त्यानंतर लॉटरीचे पैसे कुरियर करण्यासाठी सायबर चोरटयाने महिलेकडून वेळोवेळी ७५ हजार रुपये ऑनलाईनरित्या स्वतःच्या बँकखात्यात वर्ग करुन घेतले. रक्कम स्वीकारुनही लॉटरीचे पैसे मिळत नसल्यामुळे फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर महिलेने येरवडा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक अमोल वाघमारे करीत आहेत.