पुणे : कर्ज देण्याच्या बहाण्याने व्यावसायिकाला 8 लाखांचा गंडा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   व्यवसायासाठी दीड कोटी रुपयांचे लोन मंजूर करुन देण्याचे आमिष दाखवून एका व्यावसायिकाला 8 लाखांचा गंडा घातला. ६ जानेवारी ते १० फेब्रुवारी दरम्यान विश्रांतवाडीत ही घटना घडली आहे.

याप्रकरणी संग्राम सबनिस (वय ४८, रा. हडपसर ) यांनी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आयटी ऍक्ट व फसवणूकीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संग्राम यांचा इलेक्ट्रॉनिक मॅन्युफ़ॉक्चरिंगचा व्यवसाय आहे. त्यांना व्यावसायासाठी कर्जाची आवश्यकता होती. त्यासाठी त्यांनी ऑनलाईनरित्या चौकशी केली होती. त्यानुसार ६ जानेवारीला एका अज्ञात क्रमांकावरून संग्राम यांना फोन आला. त्याने नवरत्न फायनान्स कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले. व्यावसायासाठी फायनान्स कंपनीकडून दीड कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करुन देतो असे आमिष दाखविले. तसेच संग्राम यांचा विश्वास संपादित करुन विविध कारणांसाठी ऑनलाईनरित्या ८ लाख १० हजार रुपये बँकखात्यात वर्ग करुन घेतले. रक्कम स्वीकारुनही संबंधित फायनान्स कंपनीने कर्ज देण्यासंदर्भात टाळाटाळ केली. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर संग्राम यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. अधिक तपास पोलीस निरीक्षक रवींद्र कदम करीत आहेत.

—चौकट—

तरुणाची फसवणूक

बँकेतून बोलत असल्याचे सांगत सायबर चोरट्याने तरुणाकडून क्रेडिट कार्डची गोपनीय माहिती घेउन २ लाख ३३ हजार रुपयांचा ऑनलाईन गंडा घातला. याप्रकरणी सचिन ढाकणे (वय ३९) यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, सचिन एका खासगी कंपनीत नोकरीस आहेत. ते फुरसुंगी परिसरात राहायला आहेत. ५ जूनला सायबर चोरट्याने त्यांना फोन करुन बँकेतून बोलत असल्याची बतावणी केली. त्यानंतर चोरट्याने सचिनकडून बँक खात्याची माहिती घेउन ऑनलाईनरित्या २ लाख ३३ हजारांची फसवणूक केली. अधिक तपास सायबर पोलीस करत आहेत.