Pune : पुण्यात सायबर क्राईम तेजीत, iPhone चं गिफ्ट लागल्याचं सांगत 9.30 लाखाचा गंडा

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – सुशिक्षितांच्या पुण्यात सायबर गुन्हेगारी तेजीत असून, चोरटे वेगवेगळी कारणे सांगत गंडा घालत असताना महिलेने ऑनलाइन शूज खरेदी केल्यानंतर सायबर चोरट्यांनी त्यांना आयफोन गिफ्ट लागला असल्याचे सांगत तब्बल ९ लाख ३० हजार रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

याप्रकरणी मेधा समीर म्हात्रे (वय ४७, रा. लुंकड स्काय, विमाननगर ) यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुुुसार आयटी ऍक्ट व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मेधा विमाननगर भागात राहायला आहेत. त्यांचे पती एका खासगी कंपनीत नोकरीस आहेत.

त्यांनी १ जुलै रोजी त्या नेटवर सर्च करत असताना सायबर चोरट्याने त्यांना ऑफर देण्याच्या नावाखाली १ हजार ४९९ रुपयांचे शूज खरेदी करण्यास भाग पाडले. त्यानंतर सायबर चोरट्याने त्यांना फोन करुन आयफोन जिंकल्याचे सांगितले. त्यासाठी जीएसटी, इन्शुरन्सची विविध कारणे सांगून सायबर चोरट्यांनी महिलेला ऑनलाईनरित्या रक्कम भरण्यास सांगितले. आयफोन मिळण्याच्या अपेक्षेन मेधा यांनी सायबर चोरट्याच्या विविध बँकखात्यात तब्बल ९ लाख ३० हजार रुपये जमा केले. मात्र, वेळोवेळी रक्कम जमा करुननही आयफोन मोबाईल मिळत नसल्याचे मेधा यांच्या लक्षात आले. फसवणूक झाल्यानंतर त्यांनी विमानतळ पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली आहे. पोलीस निरीक्षक (गुन्हे) बळवंत मांडगे तपास करीत आहेत.
शहरात दिवसेंदिवस सायबर चोरट्यांकडून बहाणेबाजीकरून पुणेकरांची फसवणूक केली जात आहे. मात्र, तरीही सुशिक्षितांसह अशिक्षितांकडून कोणताच धडा घेतला जात नसल्याचे दिसून आले आहे. या घटना वारंवार घडत असल्याने पोलिसही “परेशान” आहेत.