पुण्यातील नामांकित हॉस्पीटलमध्ये नोकरी मिळवण्यासाठी ‘त्या’ फार्मासिस्टनं दिली बनावट कागदपत्रे

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – शहरातील नामांकित रुग्णालयात चोरी करताना पकडलेल्या फार्मासिस्टने खोटी कागदपत्रे देऊन ही नोकरी मिळविल्याचे समोर आले आहे. त्याच्यावर स्वतंत्र गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

शिवाजी गोविंद मोटे (वय २८, रा विभूतवाडी ता. आटपाडी. जि. सांगली) अशी अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अ‍ॅलन थॉमस (वय ५७, रा. वडगाव शेरी) यांनी कोरेगाव पार्क पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.

तीन दिवसांपूर्वी याच हॉस्पिटलमधून मास्क, इंजेक्शन, टॅबलेट्स मिळून ३६ हजारांची वैद्यकीय साहित्य व औषधे चोरणाऱ्या एका फार्मासिस्टला कोरेगाव पार्क पोलिसांनी अटक केली होती. त्यावेळी सुयश हिराचंद पांढरे (वय २८, रा. आंबेगाव, कात्रज) असे आपले नाव या आरोपीने सांगितले होते. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी हॉस्पिटल प्रशासनाकडे चौकशी करत आरोपीने कामावर रूजू होताना हॉस्पिटल प्रशासनाकडे दिलेल्या कागदपत्रांची तपासणी केली. त्यामध्ये ही कागदपत्रे खोटी असल्याचे तपासात पुढे आले, अशी माहिती पोलिसांनी दिली.

या हॉस्पिटलमध्ये नोकरी मिळविताना आरोपी मोटे याने स्व:ताची ओळख लपवून ठेवत खोट्या नावाने आणि बनावट कागदपत्रे हॉस्पिटल प्रशासनाला दिली. या कागदपत्रांच्या आधारे त्याने चार वर्षापूर्वी मे २०१६ मध्ये फार्मासिस्ट म्हणून या नामांकित हॉस्पिटलमध्ये नोकरी मिळविली. त्यानंतर हॉस्पिटलकडून दिले जाणारे वेतन, भत्ते तसेच विविध सेवा-सुविधांचा फायदा घेतला. संबधित आरोपीने तोतयागिरी करत खोटी कागदपत्रे देत फार्मासिस्ट म्हणून चार वर्षे नोकरी केली. हॉस्पिटलमध्ये चोरी करताना त्याला पकडण्यात आल्यानंतर त्याची ही बनवेगिरी तपासात समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.

हॉस्पिटलची फसवणूक केल्याप्रकरणी या आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस उपनिरिक्षक श्रीकांत गुरव हे करत आहेत. खोटी कागदपत्रे देत नोकरी मिळविल्यानंतर या आरोपीने गेली चार वर्षे हॉस्पिटल प्रशासनाकडून वेतन, भत्ते आणि इतर फायदे देखील घेतल्याचे समोर आले आहे.