पुण्यातील तरूणीची एक लाखाची फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – दत्तवाडी परिसरातील एका तरुणीच्या मोबाईलवर लिंक पाठवून तिला ओटीपी टाकण्यास भाग पाडत सायबर चोरट्यांनी एक लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी धनश्री सालंकार (वय 28, रा. लक्ष्मीनगर) यांनी दत्तवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धनश्री एका खासगी कंपनीत कामाला असून लक्ष्मीनगरमध्ये राहायला आहे. काही दिवसांपुर्वी सायबर चोरट्याने त्यांना मोबाईलवर एक लिंक पाठविली होती. त्यानुसार धनश्रीने लिंक उघडून पाहिली असता, त्यामध्ये रक्कम मिळणार असल्याचे नमूद करण्यात आले होते.

त्यानुसार धनश्रीने लिंकमध्ये बँकखात्याचा ओटीपी अपलोड केल्यानंतर त्यांच्या खात्यातून एक लाख रुपये कमी झाले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने दत्तवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे अधिक तपास करीत आहेत.