पुण्यात घर स्वच्छ करून देण्याच्या बहाण्यानं बंगले साफ करणारे बंटी-बबली पोलिसांच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – दिवसभर शहरात फिरत घर स्वच्छ करून देण्याचे बहाण्याने रेकी करत घरफोड्या करणाऱ्या बंटी बबलीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 5 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणत ४५ ग्रॅम सोने जप्त करण्यात आले आहे. रामा पापा जाधव उर्फ रामा सोनाजी कांबळे (वय २५, रा. शिवाजीनगर), उषा रामा कांबळे (वय २८) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

गुन्हे शाखा युनिट एकचे अधिकारी व कर्मचारी सराईत गुन्हेगाराची तपासणी करत होते. त्यावेळी त्यांना माहिती मिळाली, की कॅम्प परिसरात रामा व उषा हे घरफोडी करण्याचे साहित्य बाळगून आहेत. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून त्या दोघांना अटक करण्यात आली. आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत. त्यांनी पुणे व पिंपरी चिंचवड परिसरात २६ पेक्षा जास्त घरफोड्या केल्या आहेत. दोघेही बंटी व बबली नावाने प्रसिद्ध आहेत.

आरोपी हे भर दिवसा साफ सफाई करण्यासाठी लागणारे साहित्य झाडू, ब्रश असे साहित्य घेऊन विविध सोसायट्यामध्ये फिरत असत. ज्या सोसायट्यांमध्ये फ्लॅट बंद आहेत, त्याची रेकी करून घरफोड्या करत होते. या दोघांना अटक करून कोर्टात हजर केले असता आठ जुलै पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. त्यांच्याकडून एक ऍक्टीव्हा, गुन्हा करण्यासाठी लागणारे कटावणी, एक स्क्रू ड्रायव्हर असा एकूण अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यांनी लष्कर, भारती विद्यापीठ, कोरेगाव पार्क, कामशेत टाकवे या ठिकाणी घरफोड्या केल्याचे समोर आले आहे.