OLX वर सोफा विक्री जाहिरात पडली महागात, भामट्यांनी उकळले 28 हजार

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन – ओएलक्स वेबसाईटवर सोफाविक्रीची दिलेली जाहिरात चांगलीच महागात पडली असून, सायबर चोरट्यांनी खरेदीच्या बहाण्याने 28 हजार उकळले आहेत. ही घटना 22 ऑक्टोबरला खडकीत घडली.

याप्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात तरुणाने फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांवर आयटी अ‍ॅक्टसह फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुण एका खासगी कंपनीत नोकरीस आहे. त्याच्या नवी मुंबईतील वहिणीने सोफा विक्रीची ओएलक्सवर जाहिरात दिली होती. त्यानंतर अज्ञाताने वहिनीला फोन करुन सोफा खरेदीबाबत माहिती घेतली. त्यांनी पुण्यातील दीराचा मोबाईल क्रमांक दिला. तसेच, त्यांच्याशी संपर्क साधण्याचे सांगितले.

त्यानुसार सायबर चोरट्याने तरुणाला फोन करुन सोफा खरेदी करणार असल्याचे सांगितले. त्यासाठी ऑनलाईनरित्या मोबाईल लिंक पाठवून तरुणाला उघडण्यास सांगितले. मोबाईलवर तीनवेळा लिंक पाठवून सायबर चोरट्याने तरुणाच्या बँकखात्यातून 28 हजारांची रोकड ट्रान्सफर करुन घेतली. बँकखात्यातून रक्कम कमी झाल्यानंतर फसवणूक झाल्याचे तरुणाच्या लक्षात आले. अधिक तपास पोलीस निरीक्षक शफील पठाण करीत आहेत.