आकर्षक परताव्याच्या अमिषाने 31 जणांची 54 लाख रुपयांची फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – सिंहगड रोड परिसरात कंपनी स्थापनकरून आकर्षक स्कीम आणि महिना उत्पन्न मिळवून देण्याच्या बहाण्याने तब्बल 31 जणांची 54 लाख रुपयांना फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. रेलिग्रो इंटरनॅशनल ट्रेडिंग प्रायव्हेट लिमीटेड अशा नावाने कंपनी सुरू करण्यात आली होती.

याप्रकरणी भानुदास सखाराम शिंदे (वय 52, रा. वागळे इस्टेट, ठाणे ) यांनी सिंहगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुासर, कंपनीच्या संचालक स्नेहदिप कुलकर्णी आणि दिलीप कुलकर्णी या दोघांवर भादवि कलम 420, 12 (ब), 34 सह महा. राज्यातील गुंतवणूक दारांचे हित संरक्षण अधिनियम तसेच द प्राईज चिट्स अ‍ॅण्ड मनी सर्क्युलेशन स्किम प्रतिबंधीत कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड येथील आनंदनगर भागात दोघांनी रेलिग्रो इंटरनॅशनल ट्रेडिंग प्रायव्हेट लिमीटेड कंपनीचे कार्यालय उघडले. कंपनीद्वारे त्यांनी जाहिरात करून नागरिकांना आकर्षित केले. त्यावेळी भानुदास शिंदे यांचा आरोपींशी संपर्क झाला. त्यावेळी दोघांनी त्यांना आकर्षक स्कीम, परदेशात सहली तसेच डायरेक्ट सेलींगच्या माध्यमातून खात्रीशीर दरमहिना उत्पन्न मिळेल असे अमिष दाखविले. तर, पिरॅमिड स्ट्रक्चर प्रमाणे सेलरचे जाळे निर्माण करण्यास सांगितले गेले. यात नागरिकांना आकर्षित केल्यानंतर त्या व्यक्तीला चांगला परतावा देऊ असे सांगण्यात आले. त्यामुळे प्रत्येकाने नागरिकांना कंपनीत गुंतवणूक करण्यास आकर्षित केले.

दरम्यान, फिर्यादींना एका दिवसात 30 नागरिक कंपनीशी जोडल्यानंतर त्यांना थेट थायलंड येथे सहलीचे पॅकेज देण्याचे सांगत त्यांच्याकडून 6 लाख 6 हजार रुपये भरून घेतले. फिर्यादींसोबत आणखी 30 लोकांकडून एकूण 54 लाख 1 हजार 606 रुपये घेतले. मात्र, त्यांना कसलाच परतावा देण्यात आला नाही. तर, त्यांनी गुंतविलेले मुद्दलही न देता त्यांची फसवणूक करण्यात आली. हा सर्व प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलीसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार, दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सिंहगड रोड पोलीस ठाण्यात करत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/