हातचालाकीने एटीएम कार्ड बदलून 97 हजाराची फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – एटीएम केंद्रात गेलेल्या एका नागरिकाला पैसे काढून देण्याच्या बहाण्याने हातचालकाने कार्डबदलून त्यांच्या खात्यावरून 97 हजार रुपये काढून फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी घनश्याम गायकवाड (वय 59) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे रामटेकडी परिसरात राहण्यास आहेत. त्यांना अचानक पैशांची आवश्यक्ता भासली. त्यामुळे ते रामटेकडी जंक्शनजवळील एसबीआयच्या एटीएम केंद्रात पैसे काढण्यास गेले. त्यांनी पैसे काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, पैसे निघाले नाहीत.

दरम्यान, त्याठिकाणी एक व्यक्ती उभा होती. त्याने पैसे काढून देण्याचा बहाणा केला. तसेच, त्यांच्याजवळील एटीएम कार्ड घेतले. परंतु, हातचालाकीकरून ते कार्ड बदलले. तसेच, त्यांच्या हातात दुसरेच एटीएम कार्ड देऊन त्यांना पैसे निघत नसल्याचे सांगत पाठविले. त्यानंतर त्यांच्या कार्डवरून सोने खरेदी केले. तर, एटीएम केंद्रातून पैसे काढून त्यांची एकूण 97 हजार 700 रुपयांना फसवणूक केली. अधिक तपास वानवडी पोलीस करत आहेत.