पुण्यात व्यवसायिक महिलेची तब्बल 55 लाखांची फसवणूक

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन – मनी ट्रेंडिगमध्ये पैसे गुतंविल्यास जादा व्याजाचे आमिष दाखवत व्यावसायिक महिलेला 55 लाख रूपयांना गंडा घालण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. 2017 ते 2020 या कालावधीत ही घटना घडली आहे.

याप्रकरणी 37 वर्षीय महिलेने अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार हेमंत भोपे व लता भोपे या दाम्पत्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला कोथरूड परिसरात राहण्यास आहे. त्यांचा अलंकार परिसरात व्यावसाय आहे. आरोपी हेमंत भोपे याने गुंतवणूकी संदर्भात एक एक वर्कशॉप आयोजित केले होते. ते फिर्यादींनी अटेंड केले होते.

आरोपींनी त्यांना सन 2017 मध्ये मनी ट्रेडिगमध्ये पैसे गुंतवण्यास सांगितले होते. त्यातून मोठा नफा मिळण्याचे अमिष दाखविले. रक्कम गुंतवल्यानंतर त्यांना यातील काही रकमेवर महिना सव्वा दोन टक्के व्याज व काही रकमेवर वार्षिक 30 टक्के प्रमाणे व्याज देण्याचे आमिष दाखवले होते. त्यानुसार, फिर्यादींनी त्यानुसार त्यांनी 55 लाख रुपये गुंतविले होते. पहिले काही दिवस व्याज दिल्यानंतर त्यांना व्याज देणे बंद केले. तक्रारदार यांनी वारंवार विचारणा केल्यावर त्यांना वेगवेगळी कारणे सांगत टाळाटाळ करण्यात आली. त्यांनी गुंतवणूक केलेली मुद्दल रक्कम मागितली असता तिही देण्यात आली नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी अलंकार पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक घोडगे करत आहेत.