खोटी माहिती देउन E-Pass घेणाऱ्या 11 जणांविरुद्ध FIR दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  मुंबईत राहत असतानाही मूळगावी जाण्यासाठी मुंबई पोलिसांचे पास न मिळाल्याने पुणे पोलिसांकडे अर्ज करुन खोटी माहिती भरुन डिजीटल पास मिळविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी ११ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

मंगेश कळसकर, प्रशांत मयेकर, सागर देवरुखकर, तेजस अनंत चेवुलकर, नरेश साबळे, राजू गुजर, स्वप्नील धनावडे, अनंत डीचलकर, योगेश भोसले, सागर पवार, सिद्धेश सुवरे यांच्यावर पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाउनमध्ये एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्यासाठी पोलिसांची परवानगी घ्यावी लागते. जेथे राहत असाल त्या पोलिसांना ऑनलाइन अर्ज करावा लागतो. योग्य कारण असल्यास पोलिसांकडून पास देण्यात येतो. अन्यथा तो नाकारलाही जाऊ शकतो.

दरम्यान मुंबईत राहणाऱ्या या ११ जणांना कोकण, सातारा, सांगलीमध्ये जायचे होते. मात्र, संबंधितांना मुंबई आणि ठाणे पोलिसांकडून प्रवासासाठी डिजीटल पासेस देण्यात आले नाही. त्यामुळे त्यांनी मुंबई ते पुणे आणि पुणे ते मूळगावी जाण्यासाठी पुणे पोलिसांकडे अर्ज केले. त्यासाठी सर्वांनी अर्जामध्ये सहप्रवासाचा एकच मोबाईल क्रमांक समाविष्ट केला. त्यासोबत जोडलेले आधारकार्ड, मेडीकल प्रमाणपत्र एकच असल्याचे दिसून आले. त्यानुसार पुणे पोलिसांनी ११ जणांचे अर्ज नामंजूर करीत चौकशी केली. त्यानुसार पुणे पोलिसांकडे डिजीटल पाससाठी अर्ज करणारे सर्व ११ रहिवाशी मुंबईतील रहिवाशी असल्याचे निष्पन्न झाले. त्यांना मुंबई आणि ठाणे प्रशासनाकडून प्रवास पास देण्यात आला नाही. दरम्यान, आर्थिंक फायद्यासाठी संबंधितांना पास मिळवून देण्यासाठी रितेश लष्करे (रा. पनवेल, मुंबई ) खोटी माहिती देउन पुणे पोलिसांकडून डिजीटल पासेस मिळवित असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे खोटी माहिती देउन पास काढण्याचा प्रयत्न केल्यामुळे ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी हा तपासकरून हा प्रकार उघडकीस आणला आहे. अधिक तपास सुरू आहे.