हवामान विभागातील माजी अधिकार्‍यास Google Pay वरून सव्वा 11 लाखांना फसवलं

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन – हवामान विभागातून निवृत्त झालेल्या एका अधिकार्‍याला गुगल पेवरून पैसे पाठविणे महागात पडले असून, त्यांच्या खात्यातून 9 हजार 999 रुपयांचे ट्रान्झिक्शन होऊन तब्बल 11 लाख 25 हजार रुपये काढून फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी चतुःश्रुंगी पोलिस ठाण्यात 60 वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मूळचे संगमनेर तालुक्यातील आहेत. शिवाजीनगर येथील हवामान विभागात ते अधिकारी म्हणून नोकरीस होते. नुकतेच ते निवृत्त झाले आहेत. पेन्शनचे मिळालेले 50 लाख रूपये त्यांच्या बँकेच्या खात्यावर आहेत.

त्यापैकी 20 लाख रूपये त्यांनी गुंतवणूकीसाठी काढली होती. तर, 30 लाख रूपये खात्यात शिल्लक होते. मूळगावी घराचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे त्यांना बांधकाम व्यावसायिकास 1 लाख रूपये द्यायचे होते. त्यामुळे त्यांनी व्यावसायिकाच्या मित्राच्या खात्यावर गुगल पेवरून 50 हजार हजार दोन वेळा असे 1 लाख रूपये पाठविले. परंतु, त्यांना पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे त्यांनी गुगल ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधून माहिती घेण्यास सांगितले.

फिर्यादींनी ग्राहक सेवा प्रतिनिधीशी संपर्क साधला. त्याने फिर्यादींना 1 लिंक पाठविली. तसेच, तीच लिंक त्यांच्या खात्यावरून दुसर्‍या एका क्रमांकावर पाठविण्यास सांगितले. त्यांनी ती लिंक पाठविल्यानंतर तक्ररादार यांच्या खात्यामधून 10 वेळा नऊ हजार 999 रूपये कमी झाले. त्यामुळे त्यांनी तत्काळ बँकेच्या ग्राहक सेवा प्रतिनिधीशी संपर्क साधला. खात्यामधून पैसे कमी होत असल्याचे सांगितले. दरम्यान, फिर्यादींना कामानिमित्त परदेशात जायचे होते. त्यामुळे ते निघून गेले. तरीही त्यांच्या खात्यावरून 8 दिवस त्यांच्या खात्यातून 10 वेळा नऊ हजार 999 रूपये कमी होत होते.

फिर्यादींच्या मुलाच्या मित्राने बँकेत अर्ज केला व त्याची माहिती दिली. तरीही खात्यावरून ट्रान्झिक्शन सुरूच होते. फिर्यादी भारतात आले. त्यानंतर त्यांनी बँकेत जाऊन चौकशी केली. त्यावेळी 11 लाख 25 हजार रूपये कमी झाल्याचे समोर आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.