Pune : कालव्यामध्ये धोकादायकस्थितीमध्ये पोहोतात मुले

पुणे : मागिल आठवड्यापासून उन्हाचा कडाका वाढत असल्यामुळे थंडावा मिळविण्यासाठी कालव्यात पोहोण्याचा आनंद लुटत आहे. पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणावर असूनही धोकादायक स्थितीमध्ये कालव्यालगतची लहानसहान मुले पोहतात, ही बाब निश्चितच जीवावर बेतणारी आहे. खडकवासला धरणातून कालव्याद्वारे इंदापूर, दौंड, बारामतीमधील शेतीसाठी पाणी सोडले जाते. पाण्याचा अंदाज न येणे, प्रवाहाचा वेग जास्त असल्याने अनेकांचा बुडून मृत्यू होत असल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. दुर्दैवी घटना घडल्यानंतर पालिका प्रशासन जागे होते, त्यानंतर पुन्हा दोन-चार दिवसांनी जैसे थे परिस्थिती असते, अशी तक्रार अभ्यासकांनी केली आहे.

पालिका प्रशासनाने नागरीवस्तीमधून वाहणाऱ्या कालव्याला लोखंडी कठडे वा जाळी बसविणे अत्यंत गरजेचे आहे. पालिका प्रशासनाने तसे काम हाती घेतले होते. मात्र, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सोयीच्या ठिकाणीच जाळी बसविली. मात्र, ती तकलादू आणि निकृष्ट दर्जाची असल्याने तुटून कालव्यात पडली आहे. लोखंडी खांब चोरीला गेले आहेत. शिंदेवस्ती, गोसावीवस्ती, हडपसर गाव, गाडीतळ, उत्कर्षनगर परिसरातील कालव्याच्या सुरक्षेसाठी बसविलेली जाळी चोरीला गेली आहे. प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात असल्याची तक्रार येथील नागरिकांनी केली.

दरवर्षी एप्रिल-मे महिन्यामध्ये उन्हाचा कडाका वाढतो. त्यामुळे पोहोण्यासाठी कालव्यालगतच्या वस्तीमधील मुले कालव्यात धोकादायक परिस्थितीमध्ये पोहोतात. कालव्याच्या बाजूला भरावाची साफसफाई करून पालिका प्रशासनाने रस्ते बनविले आहेत. मात्र, रस्त्याची दुरुस्ती केली गेली नसल्यामुळे ठिकठिकाणी कड्डे पडले आहेत, काँक्रिटच्या रस्त्याला मोठे तडे गेले आहेत. जाळी तुटली आहे, अशी भयावह परिस्थिती कालव्यावरील जाळीची आणि रस्त्याची झाली आहे. मागिल आठवड्यात गोसावीवस्तीमध्ये लहान मुलांसह रिक्षा कालव्यात पडली होती. स्थानिक युवकांच्या प्रसंगावधानामुळे मुलांचा प्राण वाचला. अशा घटना वारंवार होत असतात, तरीसुद्धा पालिका प्रशासन गांभीर्याने दखल का घेत नाही, असा सवाल येथील नागरिकांनी उपस्थित केला.

गोसावीवस्तमधील साहसी फाउंडेशनच्या अध्यक्षा मयुरी बामणे यांनी रामटेकडी-वानवडी क्षेत्रीय कार्यालयाकडे कालव्याची सुरक्षा जाळी तुटली आहे, रस्ते उखडले आहेत, कालव्याची भिंत खचली आहे, कालव्याच्या भरावालगत कचरा साचला आहे. कालव्याला जाळी नसल्यामुळे अपघात होऊन वाहने कालव्यात पडण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. याबाबत तक्रार केली आहे. मात्र, प्रशासनाकडून अद्याप कोणतीही कारवाई केली नसल्याचे त्यांनी सांगितले.