पुण्यातील चर्चच्या खजिनदारानं केला 23 लाखाचा अपहार

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – चर्चचे खजिनदार असणाऱ्याने पदाचा दुरुपयोगकरुन 23 लाख रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार समोर आला आहे. देणगी स्वरुपात प्राप्त झालेल्या रकमेतील २२ लाख ७८ हजार घेतले आहेत. सप्टेंबर ते डिसेंबर २०१९ कालावधीत खडकीत ही घटना घडली आहे.

याप्रकरणी मेथोडीस्ट तमीळ (रा. खडकी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत देवा थॉमस जॉन्सन यांनी खडकी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खडकी परिसरात एक नामांकित चर्च आहे. संबंधित चर्चचा खजिनदार म्हणून मेथोडीस्ट कार्यरत होते. सप्टेंबर ते डिसेंबर २०१९ कालावधीत चर्चला प्राप्त झालेल्या देणगीपैकी तब्बल ११ लाख ३५ हजार रुपये त्यांनी ऑनलाईनरित्या स्वतःच्या बँक खात्यात वळविले. त्यानंतर रोख देणगी स्वरुपात आलेले ४ लाख १६ हजार रुपये आणि चर्चच्या नावे बँकखात्यातील २ लाख २६ हजार काढून घेतले. वेळावेळी मेथोडीस्टने खजिनदार पदाचा दुुरुपयोग करीत तब्बल २२ लाख ७७ हजारांचा अपहार केला. चर्चच्या ऑडीटवेळी पैशांचा अपहार झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अमोल भोसले अधिक तपास करीत आहेत.