Pune : पुण्यात शुक्रवारी 78 केंद्रावर 45 वर्षावरील नागरिकांना दुसरा डोस मिळणार; जाणून घ्या कोठे आणि कोणती लस उपलब्ध असणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लसीकरण मोहिम मोठ्या प्रमाणात राबवण्यात येत आहे. पुणे महानगर पालिकेने पुणेकरांना लस देण्यासाठी विविध भागात लसीकरण केंद्र सुरु केले आहेत. शुक्रवारी (दि. 14) पुणे शहरामध्ये 45 ते पुढील गटासाठी 78 केंद्रावर लसीकरण होणार आहे. ज्यांनी यापूर्वी लसीचा पहिला डोस घेतला आहे, त्याच नागरिकांना उद्या लसीचा दुसरा डोस दिला जाणार आहे.

45 वर्षावरील नागरिकांसाठी शुक्रवारी 78 केंद्र उपलब्ध असतील. सर्व केंद्रावर कोविशिल्डची लस देण्यात येणार आहे. ज्या नागरिकांनी 30 मार्चपूर्वी पहिला डोस घेतला आहे. अशा नागरिकांना दुसरा डोस दिला जाणार आहे. सर्व केंद्रांवर कोविशिल्ड दुसरा डोस उपलब्ध असेल. तसेच लसीचा पहिला डोस दिला जाणार नाही, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे.

दरम्यान, राज्य सरकारने 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण स्थगित केले आहे. 45 वर्षावरील नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे अशांना दुसरा डोस देणे आवश्यक आहे. त्यांना दुसरा डोस वेळेवर दिला नाही तर पहिल्या डोसचा काहीच उपयोग होणार नसल्याने 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण स्थगित करण्यात आले आहे.