Pune : कोरोनाच्या संकटात सिंहगड रोडवर कचराकोंडीने नागरिक हैराण, मनपाची घंटागाडी ‘बेपत्ता’ !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोना काळात संसर्गाच्या भीतीने नागरिक हवालदिल झालेले असतानाच आता नागरिक कचराकोंडीने सुद्धा हैराण झाले आहेत. शिवाय काही नागरिकांचे आरोग्य सुद्धा धोक्यात आले आहे. येथील माणिकबाग परिसरात घंटागाडी केवळ मुख्य रस्त्यावरील हॉटेलवाल्यांसाठीच येत असल्याने अनेक सोसायट्यांमध्ये राहणार्‍या नागरिकांची कुचंबना होत आहे.

प्रत्येक कुटुंबाकडून 80 ते 100 रूपये दर महिना ‘वसुली’

सिंहगड रोडवरील माणिकबाग परिसरातील हॉटेल ब्रह्मा गार्डनच्या शेजारील अमृत स्वीट मार्टमागील भागातील सुमारे 30 ते 35 रहिवाशी सोसायट्यांचा रोजचा कचरा घेऊन जाण्यासाठी पुणे महापलिकेची घंटागाडी येत नाही. महापालिकेचा स्वच्छता विभाग आणि काही खासगी ठेकेदारांमध्ये परस्पर झालेल्या अंतर्गत व्यवहारानुसार येथे खासगी ठेकेदारांची माणसं कचरा गोळा करण्यासाठी प्रत्येक सोसायटींमधून जातात आणि प्रत्येक कुटुंबाकडून 80 ते 100 रूपये दरमहिना वसूल करतात.

शुल्लक कारणावरून नागरिकांशी अरेरावीदरमहिन्याला गोळा झालेल्या या रक्कमेतून काही भाग संबंधीतांना दिला जातो. परंतु हे खासगी कचरा गोळा करणारे लोक शुल्लक कारणावरून नागरिकांशी अरेरावी करत असून कचरा नेण्याचे बंद करू, बघू कोण तुमचा कचरा घेवून जातो, अशा धमक्या देत असल्याने लोकांची कुचंबना होत आहे. शिवाय कचरा गोळा करण्याचे पैसे सुद्धा मनमानी पद्धतीने वाढवले जात आहेत. मात्र, याबाबतीत स्थानिक नगरसेवक सुद्धा दुर्लक्ष करत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

घंटागाडी जाणीवपूर्वक पाठवली जात नाहीया परिसरात घंटागाडी येण्यासाठी रस्ते असूनही घंटागाडी जाणीवपूर्वक पाठवली जात नाही. यामुळे नागरिकांना दुसरा पर्यायच नसल्याने कचरा गोळा करणार्‍यांची अरेरावी सहन करावी लागत आहे. पुणे महापालिका सर्व टॅक्स वरचेवर वसूल करते, मग नागरिकांना प्राथमिक सेवा देण्यास टाळाटाळ का करत आहे, असा सवाल नागरिक विचारत आहेत. हे संतप्त रहिवाशी लवकरच धरणे आंदोलन करण्याच्या तयारी आहेत.